सत्तांतरादिवशीच कार्यादेश काढण्याची हिंमत कशी झाली?, पालकमंत्री केसरकर संतापले; दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:50 PM2023-01-10T12:50:32+5:302023-01-10T12:52:03+5:30

जिल्हा नियोजनमधील कामे म्हणजे तुम्हाला गंमत वाटते का?

How dare to issue an order on the day after coming to power Guardian Minister Deepak Kesarkar got angry in the review meeting of development works of Kolhapur District Planning Committee | सत्तांतरादिवशीच कार्यादेश काढण्याची हिंमत कशी झाली?, पालकमंत्री केसरकर संतापले; दिले चौकशीचे आदेश

सत्तांतरादिवशीच कार्यादेश काढण्याची हिंमत कशी झाली?, पालकमंत्री केसरकर संतापले; दिले चौकशीचे आदेश

Next

कोल्हापूर : राज्यात सत्तांतर झाले त्याचदिवशी आम्ही आधीच्या सरकारने दिलेल्या कामांना स्थगिती दिली असताना अनुसूचित जाती विकास अंतर्गत सर्व विकासकामांचे कार्यादेश त्याचदिवशी काढण्याची तुमची हिंमत कशी झाली..? अशा शब्दात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांना काल, सोमवारी झापले.

समाजकल्याण हा सगळ्यात बदनाम विभाग झाला असून, यांच्या वरिष्ठांना बोलावून चौकशी लावा, असा आदेशच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीत दिला.

जिल्हा नियोजन समितीच्या विकासकामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. समाजकल्याणच्या योजना आणि निधीचे वितरण हा विषय येताच पालकमंत्री केसरकर यांनी रुद्रावतारच घेतला. सत्तांतर झाले त्याचदिवशी पूर्वीच्या सरकारने मंजूर केलेल्या जिल्हा नियोजनमधील कामांना स्थगिती देण्यात आली. तरीही तुम्ही विकासकामांचे कार्यादेश कसे काढले..? जिल्हा नियोजनमधील कामे म्हणजे तुम्हाला गंमत वाटते का? स्थगितीनंतर एका इंचाचेही काम होणे अपेक्षित नाही. जिल्हा नियोजन समिती किंवा पालकमंत्री यांच्या मंजुरीशिवाय कार्यादेश काढण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले? अशा प्रश्नांच्या फैरी त्यांनी झाडल्या.

समाजकल्याण हा सगळ्यात बदनाम विभाग झाला आहे. आता मुख्यमंत्रीच या विभागाचे प्रमुख आहेत. समाजकल्याण अंतर्गत असलेल्या अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये गरम पाणी, साबण, जेवण यासह सर्व सुविधा आहेत का? याची आठ दिवसात तपासणी करा. नसतील तर त्या सोयी निर्माण करा, असे त्यांनी बजावले.

शिक्षणाधिकाऱ्यांचीच घेतली ‘शाळा’

समाजकल्याण अंतर्गत शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा विषय आल्यानंतर शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना पालकमंत्र्यांनी तुमच्याकडे कोणत्या योजना राबविल्या जातात, असा प्रश्न विचारला. त्यावर उबाळे यांना उत्तर देता येईना. तेव्हा पालकमंत्र्यांनी शिक्षणाधिकारी आहात तुम्ही, जिल्हा नियोजनच्या बैठकीला तयारी करून येत जा. मी स्वत: शिक्षण खात्याचा मंत्री आहे हे लक्षात ठेवा, असे सुनावले. नगरपालिका विभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी चुकीच्या पद्धतीने कामे करू नका, असे सुनावले.

गिरण कसली वाटताय...?

यावेळी पालकमंत्र्यांनी सर्वच विभागांच्या योजना आणि त्यांना मिळणारा निधी यांची माहिती घेतली. जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा महिला व बालकल्याण विभाग, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य विभागातील औषधांचा तुटवडा, जिल्हा माहिती कार्यालय अशा सर्व विभागांना त्यांनी सर्वसामान्यांना उपयोगी पडतील, अशा नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत काम करण्याची सूचना केली. महिला बालकल्याण विभाग अजून गिरण कसली वाटतोय... महिलांचे कौशल्य वाढेल, अशा योजना राबवा, असे त्यांनी बजावले.
 

Web Title: How dare to issue an order on the day after coming to power Guardian Minister Deepak Kesarkar got angry in the review meeting of development works of Kolhapur District Planning Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.