एका मुलाखतीने कसे बदलले त्याचे जीवन..?
By admin | Published: January 1, 2017 12:36 AM2017-01-01T00:36:35+5:302017-01-01T00:36:35+5:30
येवतीच्या पंडितची कथा : अपंगत्वावर हिमतीने केली मात -- गुड न्यूज
विश्वास पाटील --कोल्हापूर --वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेली बातमी किंवा रेडिओवर ऐकलेली मुलाखत एखाद्याचे जीवन कसे बदलू शकते, याचे प्रत्यंतरच येवती (ता. करवीर) येथील पंडित कुंडलिक पाटील या अपंग तरुणास आले आहे. ‘हेल्पर्स’ संस्थेच्या नसिमा हुरजूक यांची कोल्हापूर आकाशवाणीवरील मुलाखत त्याने ऐकली व त्यातून प्रेरणा घेऊन तोदेखील जिद्दीने उभा राहिला. अपंगत्वावर मात करून त्याचा सुखी संसार आज फुलला आहे. पंडित ‘हेल्पर्स’च्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडोस येथील स्वप्ननगरी प्रकल्पात नोकरी करीत आहे.
घडले ते असे : पंडित डावा हात आणि उजव्या पायाने अपंग आहे. लहानपणी ताप आल्याचे निमित्त झाले आणि पोलिओमुळे त्यास कायमचे अपंगत्व आले. प्राथमिक शिक्षण गावातच झाले. सातवीपर्यंत तो कसाबसा शाळेत जात होता. त्यानंतर त्याने घरी बसूनच अभ्यास केला. बाहेर फिरता येत नसल्याने तो निराश असे. बारावीनंतर घरीच होता. पुढे काय करायचे, याबद्दल अंधार होता. मिरजेच्या शासकीय ट्रेनिंग सेंटरमधून २००४-०५ ला संगणकाचे बेसिक प्रशिक्षण घेतले; परंतु अजुनही त्याच्या जीवनाला दिशा सापडली नव्हती. एका सायंकाळी त्याने नसिमा हुरजूक यांची आकाशवाणीवरील मुलाखत ऐकली. त्यांची जिद्द ऐकून तो भारावून गेला. आपणही आयुष्यात तसे का उभे राहू नये, असा विचार त्याच्या मनात आला. त्याने भावाला उचगाव (ता. करवीर) येथील हेल्पर्स आॅफ दि हॅँडिकॅप्ड या संस्थेत पाठविले, अर्ज आणला आणि तो ‘हेल्पर्स’चा घटक बनला. गेली दहा वर्षे तो या संस्थेत आहे. आता तो संस्थेच्या स्वप्ननगरी प्रकल्पातील संगणकावरील सर्व दैनंदिन व्यवहार अत्यंत सफाईने सांभाळतो. डावा हात नसला म्हणून काय झाले, तो एकाच हाताने संगणक उत्तम पद्धतीने हाताळतो. त्याच्या कामात कुठेही चुका नाहीत. नसिमा दीदींचाही त्याच्या कामावर विश्वास आहे. संस्थेतच काम करणाऱ्या व अपंग असलेल्या पुण्याच्या निशाशी त्याचे २०१३ ला लग्न झाले. आता त्यांना पंकज नावाचा अत्यंत सुदृढ असा दोन वर्षांचा मुलगा आहे.
या प्रवासाबद्दल पंडित सांगतो, ‘शिक्षण घेतले; परंतु घरी बसून होतो. त्यामुळे आयुष्याबद्दल निराश होतो. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लाग; परंतु ‘हेल्पर्स’मध्ये आल्यावर माझा माझ्याबद्दलचाच विश्वास वाढला. धाडस वाढले. आता कोणतेही काम मी कुणाच्याही मदतीशिवाय करू शकतो. एस.टी.तून कोल्हापूरलाही एकटा जाऊ शकतो, असे अनेक अपंग आहेत की, त्यांना संधी मिळत नाही किंवा धडपड कमी पडते. त्यांनी स्वत:हून पाऊल पुढे टाकले, तर अपंग असूनही स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य असते.’
अनेकांना आयुष्यात उभे केले : देशपांडे
संस्थेचे संघटक पी. डी. देशपांडे म्हणाले, ‘पंडितसारख्या अनेक मुलांना संस्थेने आयुष्यात उभे केले आहे. अपंगाचे विवाहाने पुनर्वसन झाल्यास मुला-मुलींकडून
कुुटुंबातच त्याला आधार मिळू शकतो. अशा १७ अपंग तरुणांना ‘हेल्पर्स’ने नोकरी, घरे उपलब्ध करून दिली आहेत.’