सेवानिवृत्त सभासद संचालक मंडळात कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 08:05 PM2017-09-24T20:05:06+5:302017-09-24T20:06:34+5:30
शिक्षक बँकेचा कारभार उपविधीला धरून चालतो का? चालत असेल तर सेवानिवृत्त सभासद संचालक मंडळात कसा? अशी विचारणा करत बॅँकेचे माजी संचालक रघुनाथ खोत यांनी बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत नाव न घेता बजरंग लगारे यांच्यावर निशाणा साधला. यामध्येच प्रश्न विचारण्यावरून संभाजी पाटील व जोतिराम पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.
कोल्हापूर : शिक्षक बँकेचा कारभार उपविधीला धरून चालतो का? चालत असेल तर सेवानिवृत्त सभासद संचालक मंडळात कसा? अशी विचारणा करत बॅँकेचे माजी संचालक रघुनाथ खोत यांनी बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत नाव न घेता बजरंग लगारे यांच्यावर निशाणा साधला. यामध्येच प्रश्न विचारण्यावरून संभाजी पाटील व जोतिराम पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.
बॅँकेचे पन्हाळा प्रतिनिधी बजरंग लगारे हे मे २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाल्याने त्यांना बॅँकेच्या उपविधीनुसार संचालक म्हणून राहता येत नाही. हा मुद्दा उपस्थित करत बॅँकेच्या उपविधीनुसार सेवानिवृत्तीनंतर आपोआपच सभासदत्व रद्द होते, त्यामुळे संबंधिताला संचालक म्हणून राहता येत नाही.
मग संचालक मंडळात अशी व्यक्ती कशी? याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केल्याचे रघुनाथ खोत यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर संबंधित संचालकांनी सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी सहकार न्यायालयातून परवानगी आणल्याचे अध्यक्ष संभाजी बापट यांनी सांगितले.
जोतिराम पाटील यांनी येणे व्याजाचा मुद्दा उपस्थित करत सत्तारूढ गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सत्तारूढ गटाचे समर्थक संभाजी पाटील यांनी मध्येच पाटील यांना ‘एकेरी शब्दा’त खाली बसण्यास सांगितल्याने एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला.
कर्जदाराला रोखीने पगार देता आणि जामीनदार म्हणून आपला पगार कापून घेतल्याची तक्रार करत आपणाला मानसिक त्रास मलकापूर शाखाधिकाºयांनी दिल्याचे सदाशिव कांबळे यांनी सांगितले. हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरल्यानंतर त्याची चौकशी करण्याचे आश्वासन बापट यांनी दिले.
सुलतानी राजवट बंद करा
विरोधकांनी सभागृहात मांडलेल्या प्रत्येक ठरावाला ‘ही सूचना म्हणून घेतो’, असे बापट सांगत होते. त्यावर संतप्त झालेले शंकर मनवाडकर यांनी, ‘हे काय चाललेय, सभेत ठराव करायचाच नाही का? सुलतानी राजवट बंद करा’ अशा शब्दांत तराटणी दिली.