अध्यक्ष अन् संचालकांचीच मुले नोकरीला कशी?

By admin | Published: June 16, 2015 10:27 PM2015-06-16T22:27:25+5:302015-06-17T00:40:43+5:30

संघाने फाडला समितीचा बुरखा : उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा

How do the job of the President and the directors of the children? | अध्यक्ष अन् संचालकांचीच मुले नोकरीला कशी?

अध्यक्ष अन् संचालकांचीच मुले नोकरीला कशी?

Next

सातारा : शिक्षक बँकेच्या नोकरभरतीत सर्वसामान्य सभासदांची मुले नोकरीला लागल का? चेअरमनव संचालकांचीच मुले नोकरीत कशी लागली? सभासदांनी विठ्ठल माने व समितीचा हा पेपर तपासून त्यांना भोपळा द्यावा, असे आवाहन शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव पाटील, संभाजीराव थोरात व सिद्धेश्वर पुस्तके यांनी करत समितीचा बुरखा फाडला आहे.
शिक्षक संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित समारंभामध्ये ते बोलत होते. प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन विठ्ठल माने पारदर्शकतेचा आव आणत आहेत. त्यांचा कारभार म्हणजे ‘मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली’ असाच आहे. दिवसा लोकांना दिसावे म्हणून एसटीने जातो असे दाखवायचे आणि रात्री अंधारात शिक्षक बँकेची मोटार बोलवून घ्यायची हा त्यांचा कारभार जिल्ह्यातील शिक्षकांना चांगलाच ठाऊक आहे.
सभासदांच्या सगळ्या मुलांना न्याय देता येणार नाही व बँकेवर बोजा वाढेल असा हेतू समोर ठेवून आम्ही नोकर भरती केली नव्हती. समितीने नोकर भरती करताना वाटप रजिस्टरच ठेवले होते. नोकरीला लागलेल्यांची यादी सभासदांपुढे आम्ही मांडत आहोत. समितीचे लोक दारात येतील तेव्हा त्यांना विचारा तुमचीच पोरं तेवढी हुशार आहेत का? चेअरमन व संचालकांचीच पोरं नोकरीला कशी लागतात? स्वत:च्या पोराबरोबर नातेवाईकांचीच पोरं कशी नोकरीला लागतात? बाकीच्या सभासदांच्या मुलांनी सभासदांनी कुणाचं काय घोडं मारलंय ? स्वत:ची पोरं नोकरीला लावणे हाच का पारदर्शक कारभार ? चेअरमन माने अंधारात दूध पित आहेत मात्र सभासदांनी त्यांची कथनी व करणी अनुभवली आहे. कुणाच्या चौकशा झाल्या याची मापे पत्रकार परिषदेत काढणाऱ्यांनी समितीतले कितीजण निलंबित झाले होते याची
यादी आम्हाला जाहीर करायला लावू नये, अशा शब्दांत पाटील, थोरात व पुस्तके यांनी समितीवर टीकेची झोड उठवली.
शिक्षक संघाच्या ऐतिहासिक एकीमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. शिक्षक समितीच्या कारभाराला सभासद कंटाळले असून या निवडणुकीत सभासदांवर विश्वास दाखवतील.
शिक्षक बँकेत संघाची सत्ता असताना सभासदांच्या हिताला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले. मात्र, शिक्षक समितीने मनमानी कारभार करत सभासदांचे नुकसानच केले आहे. शिक्षक संघाच्या पाठपुराव्यामुळे शासनाने शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे शिक्षक
सभासद संघाच्याच पाठीशी उभे राहतील, असा विश्वास पुस्तके यांनी व्यक्त केला.
यावेळी रामचंद्र लावंड, बाळासाहेब साळुंखे, मच्छिंद्र मुळीक, बाळासाहेब सोनवलकर, सुनील सावंत, शिवाजी साळुंखे, महेंद्र जानुगडे, विष्णू खताळ, शिवदास खाडे, बलवंत पाटील, मोहनराव जाधव, महेंद्र अवघडे, आर. डी. खाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: How do the job of the President and the directors of the children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.