मुंबईतून पास दिल्याने गोंधळ सुरू झाल्याचे स्पष्ट; मुंबईहून माणसे येतातच कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 07:59 PM2020-05-15T19:59:07+5:302020-05-15T20:00:33+5:30
एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या महिन्यात अशा शिफारस देणाºया लोकप्रतिनिधी विरोधातही कारवाईचा इशारा दिला होता. आता बदललेल्या शासनाच्या भूमिकेनंतर प्रासंगिक कारणे पाहून जर पुणे, मुंबईतून माणसे थेट येणार असतील तर ग्रामीण भागात वाद होणार हे निश्चित आहे.
समीर देशपांडे।
कोल्हापूर : आम्ही दीड महिना लॉकडाऊनचे सर्व नियम पाळले. आगाऊपणा केला म्हणून काठ्याही खाल्ल्या. गाडया जप्त करून घेतल्या. दंड भरला. हातावरचं पोट असूनही गाडा उघडला नाही. रिक्षा काढली नाही. सगळे नियम आमच्यासाठी; मग कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढवणारी पुणे, मुंबई येथून माणसं जिल्ह्यात येतात कशी? असा संतप्त सवाल नागरिक आता करीत आहेत. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क न साधता पुणे, मुंबईतून पास दिले गेल्याने हा गोेंधळ सुरू झाला आहे.
जिल्ह्यात मुंबईहून आलेले तिघेजण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल शुक्रवारी मध्यरात्री आल्यामुळे खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर पहिल्या १० दिवसांत ८० हजारांहून अधिक नागरिक पुण्या-मुंबईसह अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत; परंतु नंतर मुंबई आणि पुणे हे रेड झोन बनल्याने अशांना गावात येण्यास बंदी घातली.
गेल्या आठवडयात मराठवाडयातील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या शिफारशीवर कागल तालुक्यातील एका गावामध्ये चौघांना सोडण्यात आले. आजही शेकडो गाडया मुंबईहून गावाकडे येण्यासाठी मुंबईत तयार आहेत. एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या महिन्यात अशा शिफारस देणाºया लोकप्रतिनिधी विरोधातही कारवाईचा इशारा दिला होता. आता बदललेल्या शासनाच्या भूमिकेनंतर प्रासंगिक कारणे पाहून जर पुणे, मुंबईतून माणसे थेट येणार असतील तर ग्रामीण भागात वाद होणार हे निश्चित आहे.
प्रशासनावर येणार ताण
मुंबईतील परिस्थिती बिघडत चालल्याने अनेकजण मुंबई, पुणे सोडून गावाकडे येण्याच्या प्रयत्नात आहेत. जर अशा मोठया संख्येने नागरिक गावोगावी येणार असतील तर त्याचा ताण प्रशासनावरच येणार आहे. अशा पद्धतीच्या कोणत्याही नागरिकांना जिल्ह्यातून परवानगी दिलेली नाही किंवा ती वरिष्ठ पातळीवरून देताना आम्हाला कोणी विचारले नाही, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
हा विषय मुख्य सचिवांपर्यंत
या अनुषंगाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, मुंबई आणि पुणे या कँटोनमेंट एरियातील एकाही माणसाला आम्ही परवानगी दिलेली नाही. आमची परवानगी न घेता हे सर्व पास मुंबई आणि पुणे पोलिसांकडून दिले आहेत. यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आम्ही हा विषय मुख्य सचिवांपर्यंत नेला आहे. पालकमंत्री सतेज पाटील हेदेखील संबंधित यंत्रणेशी बोलले आहेत. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करीत आहोत.