आवाडे-आवळे एकत्र ?

By admin | Published: January 24, 2017 11:11 PM2017-01-24T23:11:41+5:302017-01-24T23:11:41+5:30

हातकणंगलेत घडामोडी : राजू शेट्टींचा पुढाकार; जिल्ह्यात आघाडी करणार

How do you know? | आवाडे-आवळे एकत्र ?

आवाडे-आवळे एकत्र ?

Next

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यात आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासोबत आघाडी करत असताना त्यामध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयवंतराव आवळे यांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे.
हातकणंगले तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस, जनसुराज्य, ताराराणी अशी मोट बांधली आहे. आघाडीच्या प्रक्रियेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कुठेच स्थान न दिल्याने त्यांनी प्रकाश आवाडे, सुजित मिणचेकर यांना सोबत घेऊन आघाडीची बांधणी सुरू केली आहे. याबाबतची प्राथमिक बैठक सोमवारी रात्री एका अज्ञातस्थळी झाली. त्यामध्ये एकत्रित येण्याबाबत जवळपास एकमत झाले आहे; पण या आघाडीत कॉँग्रेसचे जयवंतराव आवळे यांनाही सामावून घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासाठी खुद्द राजू शेट्टी प्रयत्नशील असून, येत्या दोन दिवसांत आवळे यांच्याशी चर्चा करून आघाडीवर शिक्कामोर्तब करणार आहेत. भाजपने ‘स्वाभिमानी’ला बेदखल केल्याने आक्रमकपणे जुळवाजुळव सुरू केली. शिरोळमध्ये स्वबळावर लढताना तिथे स्थानिक पातळीवर तडजोड करण्याची तयारी राजू शेट्टी यांनी ठेवली आहे. गडहिंग्लजमध्ये माजी आमदार श्रीपतराव शिंदे, सदानंद हत्तरकी यांच्यासोबत ‘स्वाभिमानी’ची बोलणी सुरू आहेत. चंदगडमध्ये भाजपचे गोपाळराव पाटील व काँग्रेसचे भरमूण्णा पाटील, ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील या दोन्ही गटांबरोबर चर्चा सुरू आहे. भुदरगड व शाहूवाडीमध्ये स्वबळावर सामोरे जाण्याची तयारी केली आहे. पन्हाळ्यात काँग्रेससोबत, तर करवीरमध्ये चर्चा झालेली नाही. १६ ते १७ जागा ताकदीने लढण्याची तयारी ‘स्वाभिमानी’ने केली आहे.


हातकणंगलेत सुजित मिणचेकर, प्रकाश आवाडे यांच्या सोबत जयवंतराव आवळे यांनाही आघाडीत घेण्याचा प्रयत्न आहे. आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाली असली तरी सर्वजण सकारात्मक असल्याने दोन दिवसांत आघाडीची घोषणा होईल.
- राजू शेट्टी, खासदार

हातकणंगलेमध्ये आम्ही एकत्र येण्याचे ठरले आहे. जागावाटप कसे करायचे हे दोन दिवसांत ठरविले जाणार आहे.
- डॉ. सुजित मिणचेकर, आमदार

नवा पेच : ‘राधानगरी’चा निर्णय लटकणार!
जिल्हा परिषद निवडणुकीबरोबरच ‘भोगावती’ साखर कारखान्याची निवडणूक लागल्याने राधानगरी तालुक्यात आघाडीबाबत ‘स्वाभिमानी’समोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील निर्णय लोंबकळण्याची शक्यता आहे.

Web Title: How do you know?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.