Kolhapur: जिल्हा परिषद धनादेश देत नसतानाही ते वठले कसे?, वित्त विभागाभोवतीच संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:17 IST2025-02-27T13:16:42+5:302025-02-27T13:17:02+5:30
पोलिस पथक मुंबईला जाणार

Kolhapur: जिल्हा परिषद धनादेश देत नसतानाही ते वठले कसे?, वित्त विभागाभोवतीच संशय
कोल्हापूर : जिल्हा परिषद सध्या धनादेशाद्वारे व्यवहार करत नाही, मूळ धनादेश आणि बनावट धनादेशात बदल आहेत तरीही जिल्हा परिषदेचे ५७ कोटी ४ लाखांचे तीन बनावट धनादेश वठले आहेत. यामुळे बनावट धनादेश तयार करून ते वठवण्यापासूनच्या कटात वित्त विभाग, जिल्हा मध्यवर्ती बँकेची जिल्हा परिषद शाखा, ज्या बँकेत धनादेश जमा केले तेथील क्लिअरिंग ऑफिसर अशा रॅकेटचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. मोठी रक्कम असलेल्या तीन खात्यांचेच धनादेश तयार करून त्यावरील रक्कम हडप करण्यासाठी नियोजबद्धपणे कट रचल्याचीही शक्यता आहे. वेळीच हा प्रकार उघड झाल्याने लुटीचा डाव फसला आहे.
जिल्हा परिषद विकासकामांसाठीचा निधी ठेकेदारांना व अन्य देयके फंड मॉनिटरिंग सिस्टीमद्वारेच देते. धनादेशाद्वारे पैसे दिले जात नाहीत. धनादेश दिले तरी पाच लाखांवरील धनादेशाला नियमाप्रमाणे वठण्यासाठीचे संमतीपत्र दिले जाते. असे पत्र नाही, धनादेश बनावट आहे तरीही नवी मुंबईतील सानपाडा येथील आयडीएफसी फर्स्ट, सानपाडा येथील आयसीआयसी, कोटक महिंद्रा बँकेत या तीन बँकांतील क्लिअरिंग ऑफिसरनी वठवला कसा? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
नियमित धनादेश क्लिअरिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना बनावट आणि खरा धनादेश सहजपणे ओळखता येतो, बनावट धनादेश सिस्टीमही स्वीकारत नाही. तरीही बनावट धनादेश क्लिअरिंग ऑफिसरनीही पास केला आहे. सिस्टीमनेही स्वीकारले आहे, यावरून सिस्टीमही मॅनेज केल्याचा संशय निर्माण झाला आहे. ऑनलाइन धनादेश वठल्यानंतर मूळ येथील जिल्हा बँकेच्या शाखेलाही येतो. येथील क्लिअरिंग ऑफिसरला बनावट धनादेश कसा ओळखता आला नाही, असे प्रश्न अनुत्तरित आहेत. यामुळे या प्रकरणात टोळीच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही कर्मचारी ठाण मांडून
जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषदेच्या शाखेतील काही कर्मचारी दीर्घकाळ एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यांचे आणि जिल्हा परिषदेतील आर्थिक व्यवहार असणाऱ्यांचे चांगले हितसंबंध निर्माण झाले आहेत. हाही मुद्दा या प्रकरणात संशय वाढवणारा ठरत आहे.
आधी का खबरदारी घेतली नाही?
वेळीच खबरदारी घेतली म्हणून बोगस धनादेशाद्वारे तब्बल ५७ कोटींवर रक्कम हडप करण्यापासून वाचली, म्हणून जिल्हा परिषद प्रशासन प्रसिद्धीपत्रक देऊन पाठ थोपटून घेत आहे. मात्र, आपल्या तिजोरीतील धनादेशाची अचूक माहिती बोगस धनादेश तयार करण्यापर्यंत पोहोचली आहे. अशाप्रकारे गोपनीय माहिती बाहेर जाऊ नये म्हणून आधी का खबरदारी घेतली नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिस पथक मुंबईला जाणार
बनावट धनादेश वठण्यासाठी जमा केलेल्या तिन्ही बँका मुंबईतील आहेत. कोणत्याही बँकेत धनादेश जमा केल्यानंतर त्याच्या मागे संबंधित व्यक्तीचे नाव आणि त्याचा मोबाइल क्रमांक नोंदवून घेतला जातो. या प्रकरणात असे केले होते का? धनादेश जमा झालेल्या बँकेतील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक मुंबईला जाणार आहे. या पोलिसांना प्राथमिक पुरावे मिळाल्यानंतर बनावट धनादेश तयार करण्याच्या टोळीचा छडा लागणार आहे.