भांडवल संपले रुग्णांना जेवण कसे द्यायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:44+5:302021-04-29T04:18:44+5:30
कोल्हापूर : गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना वैद्यकीय सेवा व चहा, पाणी, नाष्टा जेवणाच्या सोयी-सुविधांपोटी खर्च झालेली ४५ ...
कोल्हापूर : गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना वैद्यकीय सेवा व चहा, पाणी, नाष्टा जेवणाच्या सोयी-सुविधांपोटी खर्च झालेली ४५ कोटींची बिले थकीत आहेत. गेल्यावर्षीची लाखोंची बिले अजून मिळाली नाहीत आता भांडवल नसल्याने कोविड केअर केंद्रांना जेवण कसे पुरवायचे, असा प्रश्न कंत्राटदारांना पडला आहे. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे या बिलाची रक्कम मागून तीन-चार महिने उलटून गेले तरी ती अद्याप मिळालेली नाहीत.
गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोना संसर्ग सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालये, कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड सेंटर यासह कोविड रुग्णालयातील रुग्ण व संस्थात्मक अलगीकरणातील नागरिकांना वैद्यकीय व दैनंदिन सेवा सुविधा पुरवण्यासाठी निविदा काढून कंत्राटदार नेमले होते. या सर्व सोयी-सुविधा व रुग्णांवर झालेला वैद्यकीय खर्च अशी एकत्रित गेल्यावर्षीची ४५ कोटींची बिले अजून राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला मिळालेली नाहीत.
वेळ आपत्तीची होती व मध्यंतरी तीन चार महिने कोरोनाचा संसर्ग नव्हता. त्यामुळे कंत्राटदारांनी बिलासाठी फार पाठपुरावा केला नाही. आता मात्र पुन्हा कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून तेथे रुग्णांवर उपचार केले जात आहे. गेल्यावर्षीची बिले अजून मिळाली नाहीत. भांडवल नाही त्यामुळे केंद्रांना आता पुन्हा सोयी-सुविधा व जेवण पुरविताना कंत्राटदार मात्र अडचणीत आले आहेत.
दूध अंडी, फळे..
प्रत्येक कोविड सेंटरसाठी वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून रुग्णांसाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळच्या चहापासून ते नाष्टा, जेवण, दुपारचा चहा, रात्रीचे जेवण, दूध, फळे, अंडी असा आहार पुरवला जात होता.
वैद्यकीय साधनेही
काही कंत्राटदारांकडून वैद्यकीय साधने, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूही पुरविल्या आहेत. त्याचीही बिले अजून मिळाली नसल्याने ठेकेदार अस्वस्थ आहेत.
गेल्यावर्षीपासून शिंगणापूर येथील कोविड केंद्राला जेवण पुरवत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही त्यावेळची जवळपास दीड लाखांचे बिले अजून मिळालेली नाही. आता केंद्र पुन्हा सुरू झाल्याने त्यासाठी भांडवल गोळा करताना अडचणी येत आहेत. ही वेळ नफेखोरीची नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. सगळ्यांची परिस्थिती एकसारखी असल्याने पैसे उधारीने मागायचे कुणाकडे, असा प्रश्न येतो.
जेवण पुरवठादार
---
शासकीय अधिकाऱ्यांचे आम्हाला खूप सहकार्य आहे, निधी येईल तसे ते सर्वांना रक्कम अदा करतात. शासकीय प्रक्रिया असल्याने बिले मिळायला तीन-चार महिने उशीर होणे मान्य आहे पण आता वर्ष झाले तरी माझे १४-१५ लाखांचे बिल मिळालेले नाही. आम्ही मोठे भांडवलदार किंवा श्रीमंत कुटुंबातील नाही. रुग्णांच्या आहारात कधी तडजोड केली नाही. कोविड केंद्र सुरू नव्हते तेव्हा आमचा व्यवसाय सुरू होता. आता मात्र आम्ही अडचणीत आलो आहोत.
जेवण पुरवठादार
(प्रशासनाचे म्हणणे देत आहे)