ऊसदराची कोंडी फुटणार कशी ?

By admin | Published: November 3, 2014 09:28 PM2014-11-03T21:28:34+5:302014-11-03T23:32:31+5:30

कोण ‘भारी’ ठरणार : कारखानदारांच्या भूमिकेकडे लक्ष

How to get rid of liver damage? | ऊसदराची कोंडी फुटणार कशी ?

ऊसदराची कोंडी फुटणार कशी ?

Next

संदीप बावचे - जयसिंगपूर -ऊस दरावरून प्रथमच खा. राजू शेट्टी यांनी सावध पवित्रा घेत जादा दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. कारखानदार व राज्य सरकार यामध्ये कोणती भूमिका वटवते, शिवाय अन्य संघटना व पक्ष ऊसदराबाबत आंदोलनाचे कोणते हत्यार उपसणार हेदेखील महत्त्वाचे असून, दराची कोंडी कशी फुटणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूणच ऊसदराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना की कारखानदार भारी ठरणार, हे लवकरच समजणार आहे. विधानसभेच्या पराभवानंतर जयसिंगपूर येथे १३व्या ऊस परिषदेत ऊसदर किती ठरणार, आंदोलनाचा निर्णय कोणता होणार, या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. विशेष म्हणजे सांगली, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यात व कर्नाटक राज्यात असणाऱ्या साखरपट्ट्यातील कारखानदारांनाही धास्ती लागली होती. या परिषदेत निर्णय काय होणार? पण खा. शेट्टी यांनी राज्यात व केंद्रात असणाऱ्या भाजप सरकारला २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतीचा अल्टीमेटम देऊन त्यांनी या परिषदेत काय साधले? यापूर्वी असणाऱ्या ऊस परिषदेत आठ-दहा दिवसावरच निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावरील आंदोलन सुरू होईल, अशी भूमिका संघटनेची असायची पण ऊस परिषदेमधील नूर लक्षात घेऊन मवाळकीचे भाषण खा. शेट्टी यांनी करून थेट दीर्घ मुदतीचे अल्टीमेटम जाहीर करत उपस्थित ऊस परिषदेमधील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कुणाचेही असो, संघर्ष अटळ असल्याचे सांगितले असले तरी कायद्यावर बोट ठेऊन केलेली मागणी शेतकऱ्यांच्या पदरात पाडून देण्यात ते कितपत यशस्वी होतात, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. परिषदेत सदाभाऊ खोत यांचे भाषण शेतकरी चवीने ऐकायचे, पण खोत यांचेही भाषण दणकेबाज म्हणता येणार नाही. कारण, राज्य व केंद्र पातळीवर सत्तेत सहभागी असणाऱ्या व संघटनेच्या प्रवाहात असणाऱ्या खोत यांनीसुद्धा मवाळतेचे भाषण घेतले. एकूणच ऊस दराच्या प्रश्नावर एकवटलेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी परिषदेत एकत्र आला, मात्र ठोस निर्णय न झाल्यामुळे तो नाराजीतून परतला.
कमावले आणि गमावले
जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत खा. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एकवटण्याचा प्रयत्न केला. पण, या संघटनेने ऊस परिषदेच्या निमित्ताने थोडं कमावलं... आणि भरपूर गमावलं... हाच प्रत्यंतर पाहायला मिळाला. कारण, खासदार शेट्टी यांनी आमचा एकही आमदार झाला नाही, अशी खंत व्यक्त करीत शासनाला २४ नोव्हेंबरपर्यंत ऊस दराच्या प्रश्नाचा तोडगा काढा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. एकूणच शेट्टी यांच्या भाषणातील वक्तव्य, ऊस परिषदेची गर्दी आणि परिषद संपल्यानंतर शेतकऱ्यांतील चर्चा यात दुरापास्त निर्माण झाला होता. त्यामुळे शेट्टी यांची जयसिंगपुरात झालेली ऊस परिषद ‘काहीतरी कमावले... पण भरपूर गमावले...’ अशी चर्चा सुरू झाली आहे.
अन्य संघटनांकडे लक्ष
ऊसदराच्या प्रश्नावरून शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना, शिवसेना यांच्या आंदोलनाकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘स्वाभिमानी’च्या या पवित्र्यानंतर अन्य संघटना व पक्ष किती आक्रमक होतात, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: How to get rid of liver damage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.