आचारसंहिता राबवायची कशी?
By admin | Published: December 25, 2015 12:46 AM2015-12-25T00:46:59+5:302015-12-25T00:48:32+5:30
निवडणूक यंत्रणेची हतबलता : मतदार सहलीवर गेल्याचा पुरावा नाही विधान परिषदेचे रणांगण
प्रवीण देसाई -- कोल्हापूर --प्रसारमाध्यमांमधून मतदार सहलीवर गेल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याचा सकृतदर्शनी पुरावा उपलब्ध नसल्याने आचारसंहिता भंगाची कारवाई करायची कशी असा पेच विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यान्वित केलेल्या यंत्रणेला पडला आहे. आचारसंहिता भंगाबद्दल कोणाकडूनही तक्रारही दाखल झालेली नाही. कारण महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील या दोन्हीही उमेदवारांकडून मतदार सहलीवर गेल्याची चर्चा असल्याने तक्रार करणार तरी कोण?
कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील व अपक्ष म्हणून आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहे. दोन्हीकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष कोल्हापूरकडे लागून राहिले आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणाही गतिमान झाल्या आहेत. इतर निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत खर्च करण्यास मर्यादा नाही व हिशेब सादर करण्याची सक्ती नाही, असे असले तरी एकंदरीत प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आचारसंहिता पथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे. इतर निवडणुकांमध्ये जाहीर प्रचार, कोपरासभा, प्रचारसभा, पदयात्रा, रोड शो असा जाहीर स्वरूपाचा प्रचार असतो. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्यास उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यासंदर्भात विरोधी उमेदवाराविरोधात निवडणूक विभागाकडे तक्रार करू शकतात. याउलट कोणताही जाहीर प्रचार न करता उमेदवारांकडून मतदारांच्या व्यक्तिगत भेटीगाठी घेतल्या जातात तसेच आचारसंहिता भंगसंदर्भातील तक्रारी या निवडणुकीतही दाखल केल्या जाऊ शकतात, असे असतानादेखील कोणाकडूनही निवडणूक यंत्रणेकडे तक्रार दाखल झाली नाही.
मतदार सहलीवर नेणे हे एकप्रकारे आमिषच आहे; परंतु या सहलींबाबत भक्कम पुरावा मिळत नसल्याने निवडणूक यंत्रणेला थेट त्यांच्यावर आचारसंहितेची कोणतीही कारवाई करता येत नसल्याचे चित्र आहे. कारवाई कशी करायची आणि कोणावर, अशा पेचात निवडणूक यंत्रणा दिसत आहे. याशिवाय आचारसंहिता भंगाबद्दल कारवाई करायची म्हटल्यावर त्याची कोणी तरी तक्रार देणे अपेक्षित आहे; परंतु ही तक्रार देणार कोण हा प्रश्न आहे.