दूध वाढवायचे तरी कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:17+5:302021-06-29T04:17:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दूध संकलनात वाढ करायची? मात्र, ती कशी करायची? अशी विचारणा करत आण्णासाहेब पाटील आर्थिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दूध संकलनात वाढ करायची? मात्र, ती कशी करायची? अशी विचारणा करत आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाकडून म्हैस व गाय खरेदीसाठी कर्ज प्रकरणे केली तर दूध संस्थाच अडचणीत येतील, अशी भीती ‘गोकुळ’च्या संचालकांनी व्यक्त केली.
‘गोकुळ’च्या नेत्यांनी संचालकांसह खातेप्रमुखांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत कात्याकूट चर्चा झाली. आगामी काळात वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवून काम करायच्या सूचना नेत्यांनी केली. मात्र, एवढे मोठे दूध संकलन वाढ करायची कशी? अशी विचारणा काही संचालकांनी केली. यावर जिल्हा बँक त्यासाठी ५०० कोटी कर्ज आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून देत असल्याचे सांगितले. मात्र, म्हैस दूध देण्याची थांबल्यानंतर उत्पादकांचा हप्ता थांबतो, मात्र बँक संस्थेच्या बिलातून पैसे कपात करून घेणार. यामुळे संस्था अडचणीत येणार असल्याचे काही संचालकांनी निदर्शनास आणून दिले. यावर संबंधित दूध उत्पादकांच्या अंगावर कर्ज देता येते का? हे पाहूया, असे नेत्यांनी सांगितले.
फिल्डवर भेटी द्या
अनेक विभागांत कामकाजात काहीसा विस्कळीतपणा असल्याचे निदर्शनास आल्याने खातेप्रमुखांनी प्रत्यक्ष फिल्ड जाऊन कामाची पाहणी करावी, अशी सूचना नेत्यांनी दिली.
दोन रुपये दरवाढ द्यायची कशी?
दूध उत्पादकांना दोन रुपये जादा दर देण्याचे अभिवचन दिले आहे, त्याची पूर्तता करत असताना विक्रीदर न वाढवता, पशुखाद्याच्या दरात वाढ न करता हे करायचे आहे. त्यामुळे दोन रुपये दरवाढ द्यायची कशी? यावर बरीच खलबते झाल्याचे समजते.
औषधांचा खर्च कमी करा
पशुवैद्यकीय सेवेसाठी मोठ्या प्रमाणात औषधांची खरेदी केली जाते. ती कमी करण्याची सूचना देण्यात आली. स्थानिक दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रूटमध्ये बदल केल्याने त्यातून एक कोटी रुपये वाचू शकतात, असे संचालकांनी सांगितले.