घोटाळ्यांची चौकशी सूडबुद्धीतून कशी?
By admin | Published: September 23, 2015 12:12 AM2015-09-23T00:12:21+5:302015-09-23T00:16:53+5:30
पालकमंत्र्यांचे प्रत्युत्तर : ‘कागलच्या श्रावणबाळा’चा शब्दकोशच वेगळा असल्याची टीका
कोल्हापूर : संस्था बुडविणे ही ज्यांची संस्कृती आहे, त्यांच्या तोंडी ‘सुसंस्कृत’ शब्द शोभत नाहीत, असा फटकारा लगावतानाच कागलच्या या ‘श्रावणबाळा’चा शब्दकोशच वेगळा असल्याची बोचरी टीका पालकमंत्री व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता केली. जिल्हा बँकेतील घोटाळ्यांची चौकशी ही सूडबुद्धीतून कशी? ठरते अशी विचारणाही पालकमंत्री पाटील यांनी केली आहे.जिल्हा बँकेची चौकशी पालकमंत्र्यांनी सुडबुध्दीतून नव्याने सुरू केल्याची टीका मुश्रीफ यांनी सोमवारी (दि. २१) पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्याला पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक राहुल चिकोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या या पत्रकात म्हटले आहे, ‘कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक, राज्य सहकारी बॅँक, आदी संस्थांतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची राज्य शासनाने सुरू केलेली चौकशी, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणणारी आहे. कोल्हापूर जिल्हा बॅँकेत दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्याची चौकशी पूर्वीच्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या आदेशानेच सुरू आहे. ती चौकशी सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवून पूर्ण करणे आणि घोटाळेबाजांच्या पदरात त्यांच्या भ्रष्टाचाराचे पाप बांधणे ही सूडबुद्धी कशी ठरते? जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळेच यांच्याच सरकारने बॅँकेवर १२ नोव्हेंबर २००९ रोजीच्या आदेशाने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमला. प्रशासकाच्या कारकिर्दीत बॅँकेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली, याचे आमच्या मित्रांना विस्मरण झालेले दिसते. अनेक घोटाळ्यांवर पांघरूण घालायच्या कार्यबाहुल्यामुळेच हे विस्मरण झाले असावे.
जिल्हा बॅँकेच्या अनेक शाखांत गैरव्यवहार झाले. कागल शाखेत कोट्यवधींचा अपहार झाला. केंद्र सरकारच्या कर्जमाफीतही शंभर कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाला. संचालकांच्या भ्रष्ट व मनमानी कारभारामुळे जिल्हा बॅँकेला १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी आघाडी सरकारनेच तक्रारींमुळे संचालक मंडळ बरखास्त करून चौकशी सुरू केली. ती कायद्यानुसारच आहे. सार्वजनिक पैशांवर सामुदायिक हात मारल्याचे चौकशीत निदर्शनास आले. सहकारी संस्था लुटणाऱ्यांचे पाप त्यांच्या पदरात बांधणे माझे कर्तव्यच आहे. आघाडी सरकारच्या काळातील चुकीच्या धोरणामुळे देशातील साखर उद्योग अडचणीत आला. पंतप्रधानांनी या प्रकरणी स्वत:हून पुढाकार घेत ऊस उत्पादकांचे थकीत देणे देण्यासाठी तीन हजार कोटींचे कृषिकर्ज देण्याचा निर्णय घेतला व त्याची कार्यवाही सुरू केली. राज्य शासनाने विविध उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे ‘एफआरपी’ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू होईल. गळीत हंगाम केव्हा सुरू होईल, याविषयी ‘राष्ट्रवादी’च्या माजी मंत्र्यांनी उगीच डोक्याला ताप करून घेऊ नये.
फुंडकर यांच्याविषयी
माझी राजकीय वाटचाल आणि फुंडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना जबाबदारी देण्याविषयी केंद्रातील आणि राज्यातील भाजप नेतृत्व सक्षम आहे. त्याविषयी आमच्या मित्रांच्या सदिच्छांची गरज नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
खाई त्याला खवखवे...
या घोटाळेबाजांचे कर्तृत्व चौकशी अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद आहे. या प्रकरणी कायद्यानुसार चौकशी सुरू आहे. चौकशी केवळ एका-दुसऱ्या व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तर अनेक माजी संचालक व अधिकारी यांच्यावर या घोटाळाप्रकरणी ठपका ठेवला आहे. असे असताना या गृहस्थांना सूडबद्धी दिसते म्हणजे ‘खाई त्याला खवखवे’ असा प्रकार म्हणावा लागेल.
आटापिटा यासाठी...
मुश्रीफ पक्षनेतृत्वाच्या ‘गुडबुक’मध्ये राहावे या उद्देशानेच माझ्याविरोधात सातत्याने ऊठसूट खोटेनाटे वक्तव्य करीत असल्याची टीकाही पालकमंत्र्यांनी केली आहे.