जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:49+5:302021-07-04T04:16:49+5:30
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून कोरोना-लॉकडाऊनचा फटका सहन करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता पुन्हा गॅस दरवाढीच्या भडक्याला सामोरे जावे ...
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून कोरोना-लॉकडाऊनचा फटका सहन करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता पुन्हा गॅस दरवाढीच्या भडक्याला सामोरे जावे लागत आहे. कारण १ जुलैपासून सिलिंडरच्या दरात २६ रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे तेल, डाळींपासून सगळ्या जीवनावश्यक वस्तूंना महागाईचा तडका बसल्याने नागरिकांना आम्ही जगायचे कसे? हा प्रश्न पडला आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोना सुरू झाल्यानंतर सलग तीन महिने कडक लॉकडाऊन असल्याने सगळ्यांना सक्तीने घरी बसावे लागले. अनेक कुटुंबांना उपाशीपोटी राहावे लागले. नंतरच्या चार-पाच महिन्यांत पुन्हा गाडी रुळावर येत आहे, असे वाटतानाच संसर्गाची दुसरी लाट सुरू झाली आणि तीन महिने झाले तरी कोल्हापूरला दिलासा मिळेना. या परिस्थितीमुळे सगळ्याच घटकांचा आर्थिकस्तर खालावला आहे. घरखर्च चालवणे मुश्कील झाले आहे. असे असताना महागाई कमी होऊन दिलासा मिळण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. त्यातच १ जुलैपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे तेल, डाळी, कडधान्ये अशा जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना जगण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
---
असे वाढले गॅसचे दर (ग्राफ)
महिना : घरगुती : व्यावसायिक
ऑगस्ट २०२० : ५९७ : १ हजार १११
ऑक्टोबर : - : १ हजार १३७
नोव्हेंबर : - : १ हजार २१३
डिसेंबर : ६४७ : १ हजार २६७
१५ डिसेंबर : ६९७ : १ हजार ३०३
१ जानेवारी २०२१ : १ हजार ३२१
१ फेब्रुवारी : १ हजार ५११
४ फेब्रुवारी : ७२२ : १ हजार ५०५
१५ फेब्रुवारी : ७७२ : १ हजार ४९६
२५ फेब्रुवारी : ७९७ : १ हजार ४९१
१ मार्च : ८२२ : १ हजार ५६८
एप्रिल : ८१२ : १ हजार ६ १३
मे : - : १ हजार ५६८
जून : - : १ हजार ४४६
जुलै : ८३८ : १ हजार ५२७
-
गावांत पुन्हा चुली पेटल्या
गेले वर्षभर कोरोनामुळे घर चालवायचं अवघड झालंय. त्यात गॅसचे दर सारखे वाढत आहेत. त्यामुळे आम्ही सगळं जेवण चुलीवर बनवतो आणि कोण पाहुणे आले-गेले, लवकर काही चहा, नाष्टा बनवायचा असेल तर तेवढ्यासाठीच गॅस वापरतो.
-राजश्री कांबळे, सोनाळी
--
खर्च कसा भागवायचा
गेल्या वर्षीपासून सारखे पेट्रोल-डिझेलचे वाढत आहेत. गॅस सिलिंडर, तेलापासून डाळी, कडधान्ये, भाजीपाल्यापर्यंत सगळ्यांचे दर वाढले. आता दुधाचाही दर वाढवणार आहेत. या सगळ्या जीवनावश्यक वस्तू असल्याने त्यावर खर्च केल्याशिवाय पर्याय नाही. पैसे नसल्याने आर्थिक चणचण असते. तरी त्यातनं मार्ग काढत एखादी गरज पूर्ण न करता काटकसरीने राहावे लागत आहे. असंच होत राहिलं तर घरखर्च कसा भागवायचा.
-दीपाली यादव, मार्केट यार्ड
--
आमचं एकत्र कुटुंब आहे. घरात १८ माणसं. पानटपरी आहे, पण गेली तीन महिने बंद. कमावत्या माणसांना घरात बसावं लागलंय. एवढ्या माणसांसाठी काय नाही तर किमान रोजच्या जेवणाचा खर्च, कपडेलत्ते, आता शाळेचा खर्च हे तर भागवायलाच लागतंय. त्यातनं आम्ही निभावून नेतोय.
-वैशाली वरुटे, फुलेवाडी
--