उत्पादकांची माहिती दिल्याशिवाय दरफरक कसा बघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:17+5:302021-04-07T04:25:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोविड काळातील खरेदीच्या उत्पादन आणि उत्पादकांची माहिती दिल्याशिवाय दरफरक तरी कसा पाहणार अशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोविड काळातील खरेदीच्या उत्पादन आणि उत्पादकांची माहिती दिल्याशिवाय दरफरक तरी कसा पाहणार अशी विचारणा अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला केली आहे. ही सर्व माहिती दिल्यानंतर संबंधित उत्पादकांकडे चौकशी करून दराबाबत माहिती देण्यात येणार आहे.
कोविड काळातील खरेदीबाबत अनेक तक्रारी झाल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाला खरेदी केलेल्या वस्तूंमधील दरफरकाबाबतची माहिती मागविली होती. यावर या विभागाकडून लेखी काहीही आलेले नाही असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत होते. मात्र, आमच्या विभागाकडून आठ दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेला पत्र पाठविण्यात आले आहे. जोपर्यंत आम्हांला जिल्हा परिषदेने कोणती उत्पादने, कधी आणि कोणत्या उत्पादकाकडून घेतली याची माहिती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्यावेळचे दर कसे तपासणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आता ही माहिती आरोग्य विभागाने अन्न व औषध प्रशासन विभागाला द्यावी लागणार आहे.
कोविडच्या काळात जिल्हा परिषदेमध्ये कोट्यवधी रुपयांची खरेदी केंद्रीय पध्दतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडेही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनीही या प्रकरणाची चौकशी लावली आहे. कोणत्या ठेकेदारांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत जादा दराने साहित्य आणि वस्तूंचा पुरवठा केला आहे याची माहिती देसाई यांनी मागविली आहे.
कोट
जिल्हा परिषदेने आम्हांला जी काय खरेदी केली आहे त्याची माहितीच दिलेली नाही. ही माहिती जोपर्यंत आम्हांला मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यावेळी वस्तूंचा दर काय होता आणि किती रुपयांना नेमका पुरवठा करण्यात आला याची माहिती घेणे आम्हांला शक्य होणार नाही. तसे लेखी पत्र आठ दिवसांपूर्वीच आम्ही जिल्हा परिषदेला पाठविले आहे. आम्ही स्वतंत्रपणे काही डिलर्सकडे चौकशी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक माहिती आल्यानंतरच ही प्रक्रिया गतिमान होईल.
सपना घुणकीकर
प्रभारी सहाय्यक आयुक्त,
अन्न व औषध प्रशासन विभाग कोल्हापूर