महाडिक तुमच्यासोबत किती दिवस राहणार?
By admin | Published: December 18, 2015 01:14 AM2015-12-18T01:14:44+5:302015-12-18T01:16:29+5:30
विधान परिषद निवडणूक : कोरे यांची फडणवीसांना विचारणा, भाजपमध्ये प्रवेश केल्यास पाठिंबा
कोल्हापूर : आमदार महादेवराव महाडिक यांची प्रत्येक निवडणुकीत वेगळीच भूमिका असते. आताही ते विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आहेत. ते भाजपसोबत किती दिवस राहणार आणि त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा, अशी विचारणा वारणा उद्योग समूहाचे नेते विनय कोरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच केल्याचे समजते.
कोरे यांनी बुधवारी (दि. १६) नागपूरला जाऊन फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांबद्दल आदर असल्यामुळेच त्यांची भेट घेतली; परंतु कोरे गटाने काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनाच पाठिंबा जाहीर केला असून, थेट प्रचार सुरू केला असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
या निवडणुकीत कोरे यांच्या भूमिकेलाही महत्त्व आहे. त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत. भाजपला आता राज्यात विधान परिषदेतील एकेक जागाही महत्त्वाची आहे; कारण या सभागृहात सत्ताधाऱ्यांचे बहुमत नाही. त्यामुळे कोल्हापुरात कोरे यांनी भाजपने पाठिंबा दिलेल्या महाडिक
यांना पाठिंबा द्यावा, असा आग्रह भाजप नेत्यांचा होता. त्यासाठी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोरे यांची वारणानगरला जाऊन भेट घेतली. त्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार ते नागपूरला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून आले; परंतु त्यांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य वरिष्ठ नेत्यांना महाडिक यांना पाठिंबा देण्यात आपल्याला अडचणी असल्याचे सांगितले. महाडिक आज अपक्ष म्हणून लढत आहेत. ते भाजपसोबतच राहतील याची खात्री नाही. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा किंवा त्यांनी तुमच्या पक्षाचीच उमेदवारी घेतली असती तर मला त्यांना पाठिंबा देण्यात अडचण नव्हती, असेही विनय कोरे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले. (प्रतिनिधी