आणखी किती दिवस नोकरीची प्रतीक्षा करू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:25 AM2021-02-24T04:25:35+5:302021-02-24T04:25:35+5:30
कोल्हापूर जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. मैदानी खेळात पुरुषांचे मोठे वर्चस्व आहे. सध्या महिलाही या क्षेत्रात मोठी भरारी घेत ...
कोल्हापूर जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. मैदानी खेळात पुरुषांचे मोठे वर्चस्व आहे. सध्या महिलाही या क्षेत्रात मोठी भरारी घेत आहेत. याची सुरुवात चिखलीसारख्या गावातून स्नेहांकिता वरुटे या मुलगीने पाॅवरलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये वर्चस्व मिळवत आपले कसब दाखवले आहे. या खेळातील तिच्या देदीप्यमान कामगिरीने स्नेहांकिता वरुटेला दोनवेळा क्रीडा क्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे, पण शासकीय नोकरभरतीत गेली दहा वर्षे तिला प्रतीक्षा करावी लागली असल्याने शिवछत्रपती पुरस्काराचाच तो अपमान असल्याची भावना आता स्नेहांकिताच्या मनात निर्माण झाली आहे.
२००७ ला न्यूझीलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्नेहांकिता वरुटेने चार सुवर्ण व दोन ब्राँझ पदकांची लयलूट केली होती. यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. पाॅवरलिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अकरा सुवर्ण व राज्य, राष्ट्रीय स्तरावर ६७ पदकांची लयलूट करून मैदानी खेळातील महिलांच्या कोल्हापुरी वर्चस्वाचा ठसा स्नेहांकिताने उमटवला होता. या कामगिरीची दखल घेत शासनाने तिला २००८-१९ मध्ये बेंचप्रेस प्रकारात व २०११-१२ मध्ये पॉवरलिफ्टिंगसाठी क्रीडा क्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार दोनवेळा प्रदान करण्यात आला आहे, अशी कामगिरी करणारी ती कोल्हापूरची पहिली महिला खेळाडू आहे.
शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला राज्य शासनाने थेट वर्ग दोनच्या अधिकारी पदावर म्हणून शासकीय सेवेत रुजू करून घेणार असल्याचे जाहीर केले होते, पण स्नेहांकिता वरुटे गेली दहा वर्षे या संधीच्या प्रतीक्षेत आहे. लोकप्रतिनिधी, क्रीडाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांना स्नेहांकिताने आपल्याला शासकीय सेवेत रुजू करून घेण्यासाठी अर्ज विनंत्या केल्या; परंतु आजही तिच्या नशिबी प्रतीक्षाच असल्याने शिवछत्रपती पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंसह हा छत्रपतींचा अपमान नाही का? असा सवाल उपस्थित केला.