आणखी किती पल्लवींचा बळी?

By Admin | Published: June 21, 2016 12:59 AM2016-06-21T00:59:15+5:302016-06-21T01:18:04+5:30

छेडछाडीमुळे जगणे मुश्कील : तरुणी, महिलांसाठी शहर असुरक्षित; पोलिसांचा धाक कमी; मोहिमा कागदावरच

How many more victims are killed? | आणखी किती पल्लवींचा बळी?

आणखी किती पल्लवींचा बळी?

googlenewsNext

एकनाथ पाटील / इंदुमती गणेश- कोल्हापूर
फुलेवाडी-बोंद्रेनगर येथे पल्लवी बोडेकर या अल्पवयीन मुलीने परिसरातील तरुणांकडून वारंवार होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून रविवारी रात्री आत्महत्या केली. हा प्रकार अतिशय गंभीर व सुन्न करणारा आहे. पल्लवीच्या आत्महत्येमुळे तीचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या संवेदनशील घटनेमुळे कोल्हापूर शहरातील तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. गेल्या सहा महिन्यांत शहरात पोलिस दप्तरी ६० पेक्षा जास्त छेडछाड, विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.


छेडछाडीच्या रोजच्या घटनांमुळे कोल्हापूर शहर महिला, तरुणींना असुरक्षीत बनले आहे. शहरात भाजीपाला खरेदीसाठी, देवदर्शनासह अन्य कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिला व शाळा-कॉलेजला जाणाऱ्या तरुणींचा भरदिवसा रस्त्यावर हात धरला जात आहे. या घटनांमुळे महिला व तरुणींची मानसिकता खचत असून, त्यांच्या कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. अशा गंभीर घटनांमुळे त्यांचे जीवन असुरक्षित बनले आहे.
मुंबईतील शक्ती मिल परिसरात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील महिला व तरुणींच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक स्थळी, रस्त्यावर किंवा निर्जन परिसरात योग्य ती उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. प्रशासनाने फक्त समिती स्थापन केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे औदार्य दाखविलेले नाही.
शहरासह उपनगर, ग्रामीण भागात शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या तरुणींना घरात घुसून, भररस्त्यावर अडवून हात धरणे अशा गंभीर घटना घडू लागल्या आहेत.

छेडछाडीची ठिकाणे
महिला दक्षता समितीने शहरातील ठीकाणांची पाहणी करून अहवाल तयार केला आहे. त्यानुसार छेडछाडीची प्रमुख ठिकाणे खालील आहेत.
एनसीसी भवन परिसर,
शिवाजी विद्यापीठ परिसर,
राजाराम तलाव,
आर.के.नगर,
के.आय.टी. कॉलेजकडे जाणारा रस्ता व भारती विद्यापीठ परिसर,
तपोवन मैदान,
कोल्हापूर विमानतळ परिसर,
कात्यायनी परिसर,
सासने मैदान,
रंकाळा परिसर,
गांधी मैदान,
सायबर कॉलेज,
सर्व शाळा-महाविद्यालयांचा परिसर, बसस्टॉप


तरुणींची रस्त्याने जाताना, एस.टी., बसमध्ये अथवा महाविद्यालयाच्या परिसरात तरुणांकडून छेड काढली जाते. घरी सांगितले तर आपले शाळा-कॉलेज, शिक्षण बंद होईल, या भीतीपोटी तरुणी हा त्रास निमूटपणे सहन करीत असतात. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी महाविद्यालयात लेडीज रूममध्ये तक्रार पेट्या बसविण्यात आल्या होत्या.


६ महिन्यांत ६० गुन्हे दाखल
कारवाईचा फार्स
दिल्लीत ‘निर्भया’ प्रकरण घडल्यानंतर कोल्हापुरात तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या उपस्थितीत पोलिस मुख्यालयात एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यात पोलिस प्रशासनाने मुलींनी धाडसाने पुढे येऊन तक्रार करावी, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास दिला होता. त्यानंतर काही दिवस कारवाईचा फार्स केला गेला. पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती!


‘खुले व्यासपीठ’ संकल्पना बंद
तरुणींना आई-वडिलांजवळ मनमोकळेपणे बोलता येत नाही. त्यामुळे तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी शहरातील महाविद्यालयीन तरुणींची पोलिस मुख्यालय येथे बैठक घेतली होती.
यावेळी तरुणींचा सहभाग उत्स्फूर्तहोता. महाविद्यालयात अथवा घरी जाताना तुम्हाला त्रास होत असेल तर मनमोकळेपणाने सांगा, अशी सूचना करताच, अनेक तरुणींनी उभे राहून आपली मते व्यक्त केली होती; परंतु त्यांच्या बढतीनंतर गेल्या तीन वर्षांपासून हे खुले व्यासपीठ भरलेच नाही.


समिती कागदावर
राज्य शासनाच्या आदेशानुसार महिला सुरक्षेच्या समितीवर पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, ‘महावितरण’चे अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे.
या समितीची तरुणी व महिलांच्या सुरक्षेसंदर्भात पोलिस मुख्यालयात एकदाच बैठक झाली. त्यानंतर बैठक किंवा पुढील उपाययोजना करण्यासंबधी चर्चाही या अधिकाऱ्यांत झालेली नाही. समिती फक्त सध्या कागदावरच दिसते.


या कलमाखाली होते कारवाई
तरुणींची छेडछाड करणाऱ्या तरुणांवर मुंबई पोलिस कायदा (११०/७) नुसार सार्वजनिक ठिकाणी गोंगाट, तरुणींची छेडछाड, शांततेला बाधा आणणे या कलमाखाली कारवाई केली जाते.


‘महिला बिट मार्शल’ उपक्रम बारगळला
शहरातील कॉलेज, बसस्टॉप, आॅफिस, आदी परिसरात तरुणींसह महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढू लागल्याने अशा रोमिओंना चाप लावण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांनी हद्दीमध्ये महिला पोलिस बिट मार्शलना लक्ष ठेवण्यास सांगितले होते.
नव्याचे नऊ दिवस म्हणून त्यांनी हा प्रयोग काही दिवसांसाठीच केला. त्यानंतर मोटारसायकलवरून बाहेर पडणाऱ्या महिला पोलिस दप्तरी कक्षामध्ये बसलेल्या दिसून येत आहेत. हा उपक्रमही बारगळला.

Web Title: How many more victims are killed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.