आणखीन किती बळी घेणार प्रशासन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:51+5:302021-07-10T04:16:51+5:30
चंदगड : ताम्रपर्णी नदीवरील दुंडगे येथील पूल धोकादायक असून अनेकांना यापूर्वी आपला जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी रात्री पुन्हा ...
चंदगड : ताम्रपर्णी नदीवरील दुंडगे येथील पूल धोकादायक असून अनेकांना यापूर्वी आपला जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी रात्री पुन्हा एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याने आणखीन किती जणांना जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येइल, असा सवाल लोकांकडून उपस्थित केला जात आहे.
गुरुवारी रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे अंकुश रामचंद्र गोवळकर (वय ३०) हा युवक पुलावरून खाली पडला. त्यामुळे अंकुशचा नदीत बूडून मृत्यू झाला.
दुचाकीवरील दुसरा युवक संतोष सुरेश लोहार (वय २८) हा पुलाच्या बाजूला पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
संबंधित घटनेची माहिती मिळताच कोवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मतदेह बाहेर काढून पंचनामा केला. जखमीला गडहिंग्लज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. अंकुशच्या पश्चात पत्नी, दोन मुली व भाऊ असा परिवार आहे.
दुंडगे येथील ताम्रपर्णी नदीवरील हा पूल जीर्ण झाला असून अरुंद व दोन्ही बाजूला मजबूत संरक्षक कठडा नसल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याबाबत अनेकवेळा आवाज उठवूनसुद्धा पुलाच्या पुनर्बांधणीकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. केवळ तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेण्याचे काम प्रशासन करते. त्यामुळे आणखीन एका युवकाचा हाकनाक बळी गेल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहेत.
चौकट :
अपघात झाल्यानंतरच प्रशासन होतय जागे
हा पूल धोकादायक असून त्याठिकाणी योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात नाही. अपघातानंतर लोकांच्या समाधानासाठी केवळ तात्पुरती डागडुजी करून प्रशासनांकडून वेळ मारून नेले जात आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रश्न सुटला नाही.
लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज
पूल खूप जीर्ण झाला असून तो नव्याने बांधण्याची गरज आहे. त्यासाठी शासनदरबारी योग्य तो पाठपुरावा करून या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच हा प्रश्न कायमचा निकालात निघू शकतो.
फोटो ओळी : दुंडगे (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीवरील धोकादायक पूल.
क्रमांक : ०९०७२०२१-गड-०२