महापौर किती करायचे एक की दोन?, कॉँग्रेस आघाडीत दुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 11:41 AM2020-02-04T11:41:52+5:302020-02-04T11:59:03+5:30
आगामी नऊ महिन्यांच्या काळात महापौर होण्याची संधी एकाला द्यायची की दोघांना यावरच कॉँग्रेस पक्षात दुमत असल्याचे सोमवारी झालेल्या पक्षातील नगरसेवकांच्या बैठकीत स्पष्ट झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी उर्वरित काळाकरीता एकाच व्यक्तीला महापौर करावे, अशी भूमिका घेतली असताना काही नगरसेवक व एका पदाधिकाऱ्याने एक ‘कोल्हापूर उत्तर’ला तर दुसरी संधी ‘कोल्हापूर दक्षिण’ला द्यावी, असा प्रस्ताव समोर आणला. त्यावर अंतिम निर्णय हा उद्या, बुधवारी होणार आहे.
कोल्हापूर : आगामी नऊ महिन्यांच्या काळात महापौर होण्याची संधी एकाला द्यायची की दोघांना यावरच कॉँग्रेस पक्षात दुमत असल्याचे सोमवारी झालेल्या पक्षातील नगरसेवकांच्या बैठकीत स्पष्ट झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी उर्वरित काळाकरीता एकाच व्यक्तीला महापौर करावे, अशी भूमिका घेतली असताना काही नगरसेवक व एका पदाधिकाऱ्याने एक ‘कोल्हापूर उत्तर’ला तर दुसरी संधी ‘कोल्हापूर दक्षिण’ला द्यावी, असा प्रस्ताव समोर आणला. त्यावर अंतिम निर्णय हा उद्या, बुधवारी होणार आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागा नवीन महापौरांकरीता पुढील आठवड्यात निवडणूक लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी कॉँग्रेसच्या सर्व नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे अजमावून घेतले. यावेळी दीपा मगदूम, नीलोफर आजरेकर, जयश्री चव्हाण, उमा बनछोडे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. मात्र, चौथ्या इच्छुक इंदुमती माने या बैठकीला उपस्थित नव्हत्या.
पालकमंत्री पाटील यांनी इच्छुकांना विचारले तेव्हा चौघीनींही ‘मी इच्छुक आहे; माझा विचार करावा.’असे सांगितले. त्यावेळी दोन-चार महिन्याला महापौर करायला लागत असल्याने समाजातून टीका होत आहे. आता हा प्रकार बंद करून आणि पुढील नऊ महिन्यांच्या काळाकरीता एकीलाच संधी दिली जाईल, तुम्ही पाच जणी एकत्र बसून एकाचे नाव निश्चित करावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली तेव्हा इच्छुकांनी ‘तुम्हीच निर्णय घ्या, तो आम्हाला मान्य असेल,’ असे सांगितले.
परंतु स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांनी एकीला संधी देण्याऐवजी दोघांनी द्यावी आणि ती एक ‘उत्तर’मधील तर दुसरी ‘दक्षिण’मधील नगरसेविकेला द्यावी, अशी सूचना मांडली. आगामी काळात महापालिकेची निवडणूक आहे, त्यामुळे चार-चार महिने दोघींना संधी द्यावी, असा आग्रह देशमुख यांनी धरला. अन्य काही नगरसेवकांनी देशमुख यांच्या सूचनेचा विचार करावा,असे सांगितले.
महापौरपदासाठी लॉबिंग करू नका, शक्तिप्रदर्शन करू नका, मलाच महापौर करा म्हणून समाजाची वेगवेगळी शिष्टमंडळे आणून मला भेटवू नका, अशा सक्त सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी सर्व इच्छुकांना दिल्या. सुमारे पस्तीस मिनिटे चर्चा झाली, परंतु ठाम निर्णय मात्र झाला नाही.
महापौर एक करायचा की दोन यावरच दुमत झाल्यामुळे अंतिम निर्णयासाठी उद्या, बुधवारी पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत इच्छुक उमेदवारांना वीस-वीस मिनिटे वैयक्तिक चर्चेला वेळ दिली जाणार आहे. मला महापौर का करावे हे या वेळेत इच्छुकांनी पालकमंत्र्यांना स्पष्टीकरण द्यायचे आहे.
दीपा मगदूम, आजरेकर यांची नावे चर्चेत
महानगरपालिकेत गटनेते शारंगधर देशमुख यांचा एक गट कार्यरत आहे. ते स्वत: गटनेते असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडे काही नगरसेवकांची ऊठबस असावी. त्यांनी दोन महापौर करण्याचा तसेच ‘उत्तर व दक्षिण’चा मुद्दा मांडल्यामुळे दीपा मगदूम व नीलोफर आजरेकर यांची नावे चर्चेत आली आहे. मगदूम यांच्या मुलांची तर आजरेकर यांच्या दिराची देशमुख यांच्याबरोबर घनिष्ठ मैत्री आहे. त्यामुळे देशमुख त्यांच्याच नावांचा आग्रह धरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.