इमारतीचा खर्च चार कोटी कसा?
By admin | Published: April 30, 2015 12:39 AM2015-04-30T00:39:31+5:302015-04-30T00:43:38+5:30
सचिन जाधव, एस. व्ही. पाटील यांची विचारणा : नेपाळ, तिरूपतीला सुकाणू समितीची बडदास्त कशासाठी ?
राजाराम लोंढे- कोल्हापूर -जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची टोलेजंग इमारत बांधल्याचा डांगोरा सत्तारूढ गटाचे नेते पिटत आहेत; पण इमारतीचे बजेट सव्वादोन कोटींवरून चार कोटी कसे झाले, गेले सहा वर्षे सुकाणू समितीची नेपाळ, तिरूपती, गोवा या ठिकाणी बडदास्त का ठेवली, हीच एम. आर. पाटील यांची पारदर्शकता काय? असा सवाल महालक्ष्मी विकास आघाडीचे नेते सचिन जाधव व एस. व्ही. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
सचिन जाधव व पाटील म्हणाले, ज्यांना शिक्षक बॅँकेत नाकारले त्यांनी आपल्या बगलबच्च्यांना पॅनेलमध्ये घुसविण्याचा प्रयत्न केला. सर्वच केडरमध्ये स्वार्थी वृत्तीने अंधारात ठेवून काम केल्याने निवडणूक बिनविरोध झाली नाही; पण त्याचे खापर आमच्यावर फोडण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. एम. आर. पाटील हे सुकाणू समितीच्या हातातील बाहुले आहेत, त्यांनी सहा वर्षांत संचालकांना विचारले नाही; पण सुकाणू समितीला जवळ केले. सुकाणू समितीला गोवा, नेपाळ, तिरूपतीसह चांगल्या हॉटेलमध्ये बडदास्त का राखली, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे. कर्मचारी सोसायटीची केलेली प्रगती केवळ आपल्यामुळेच झाल्याचे एम. आर. पाटील सांगत आहेत. आम्ही संचालकांनी त्यांना साथ दिली नसती तर ते शक्य झाले असते काय? आम्ही त्यांना प्रामाणिकपणे साथ दिली; पण त्यांनी संचालकांना बाजूला करून सुकाणू समितीला हाताशी धरून कारभार केला. याला कंटाळून दोन वर्षांपूर्वी ११ संचालकांनी बंड करण्याचा निर्णय घेतला; पण संस्थेच्या हितासाठी असे होऊ दिले नाही. सहा वर्षे संचालकांना अंधारात ठेवून सुकाणू समितीमधील काहींना हाताशी धरून एम. आर. पाटील यांनी अनेक भानगडी केल्या आहेत. त्याचा पाढा सभासदांसमोर वाचला आहे. बिनविरोध करतो म्हणत संघटनांना खेळवीत ठेवण्याचे काम करणाऱ्यांच्या अंगावर खेळी उलटली आहे.
संस्था इमारतीचे २.१० कोटींचे अंदाजपत्रक होते. तांत्रिक संवर्गातील अधिकारी असल्याने चेअरमन एम. आर. पाटील यांना इमारतीबाबतचे सर्वाधिकार दिले. त्यांनी इमारतीचा खर्च चार कोटींपर्यंत वाढविला. अंदाजपत्रकीय दरात जास्तीत जास्त ३० टक्के वाढ होऊ शकते. हा खर्च करतानाही संचालक मंडळाला माहिती दिली नाही. एवढा खर्च करून त्याचा सभासदांना फायदा होणार का? त्याचा भार सभासदांवर पडणार आहे. एवढ्या गुंतवणुकीतून उत्पन्न किती मिळणार आहे, याची उत्तरे सत्तारूढ मंडळींना द्यावी लागतील.
इमारतीसाठी नवीन विद्युत साहित्य खरेदी करताना संबंधित कंपनीने ४० टक्के डिस्काऊंट दिला; पण बिले नियमित दरानेच दिली. ही डिस्काउंटची रक्कम कुणाच्या खिशात गेली, याचे उत्तर एम. आर. पाटील यांनी द्यावे, असे आवाहन जाधव व पाटील यांनी केले.
चेअरमनपदाला विरोध केल्यानंतर एम. आर. पाटील यांनी ए. व्ही. कांबळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाच्याने मुदाळ तिठा शाखेत अफरातफर केल्याने कांबळे अडचणीत आले. म्हणूनच या दोघांनी गळ्यात गळे घातल्याचा आरोप सचिन जाधव यांनी केला.