रस्त्यासाठीची फरफट थांबणार तरी कधी ?

By Admin | Published: August 16, 2016 09:46 PM2016-08-16T21:46:22+5:302016-08-16T23:40:46+5:30

ग्रामस्थांचा संतप्त सवाल : स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६९ वर्षांत रस्ताच नाही

How to stop the road? | रस्त्यासाठीची फरफट थांबणार तरी कधी ?

रस्त्यासाठीची फरफट थांबणार तरी कधी ?

googlenewsNext

शिवराज लोंढे -- सावरवाडी --स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या ६९ वर्षांत करवीर तालुक्यातील चाफोडी ते बेरकळवाडी हा डोंगरी भागातील रस्ता झालेला नाही. लोकप्रतिनिधी, प्रशासन व्यवस्थेने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे गेली पाच दशके दुर्लक्ष केल्याने सामान्य जनतेला अनंत यातना भोगाव्या लागत आहेत.करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील सातेरी महादेवाच्या कुशीत वसलेल्या चाफोडी ते बेरकळवाडी या दोन गावांना जोडणारा रस्ता अद्याप झालेला नाही. पाऊलवाटेनेच ग्रामस्थांना ये-जा करावी लागते. संबंधित खात्यात लेखी निवेदन देऊनही डोंगरी भागातील रस्त्याच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. माध्यमिक शाळेतील शाळकरी मुला-मुलींना काटेरी पाऊलवाटेनेच, तर माध्यमिक शिक्षणासाठी चाफोडी गावाकडे ये-जा करावी लागते. १९७२ ला पडलेल्या दुष्काळावेळी रोजगार हमीतून पाऊलवाट तयार करण्यात आली. ती आजतागायत तशीच आहे. चाफोडी, बरकळवाडी, दोनवडी या तीन गावांची एकच ग्रुप ग्रामपंचायत आहे. मात्र, शासकीय निधीअभावी या वाटेचे रुंदीकरण अथवा दुरुस्ती झालेली नाही. नागमोडी वळणे घेत दऱ्या-खोऱ्यातून जाणाऱ्या या पायवाटेने शाळकरी मुली, स्त्रिया यांच्या संरक्षणाचा प्रश्न कित्येकदा ऐरणीवर आहे. डोंगराळ प्रदेश असल्यामुळे खाचखळग्यांतून, जंगली झाडाझुडपांतून या दोन्ही गावांच्या ग्रामस्थांची ये-जा सुरू असते.
चाफोडी व बेरकळवाडी गावच्या ग्रामस्थांना रस्त्याची मोठी आवश्यकता असून, वाहतुकीची मोठी गैरसोय असल्यामुळे सातेरी, धोंडेवाडी, बीडशेड मार्गे २0 किलोमीटर अंतरावरून चाफोडी गावाकडे वाहने घेऊन ये-जा करावी लागते.
बेरकळवाडी, दोनवडी गावांतील ग्रामस्थांना शिधापत्रिकेवरील अन्नधान्य, सहकारी बँक व्यवहार, विविध दाखले काढण्यासाठी अथवा खतांचा पुरवठा करणे, शेती, आॅफिसला जाणे यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. चाफोडी ते बेरकळवाडी हा चार किलोमीटरचा रस्ता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ६९ वर्षांत झाला नसल्याने सामान्य जनतेतून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याच्या अभावामुळे डोंगरी भागातील मुलींना माध्यमिक शिक्षणाला मुकावे लागते, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात कधी येणार? चाफोडी ते बेरकळवाडी या रस्त्यासाठी ग्रामस्थांना लढा उभारावा लागणार आहे.


चाफोडी ते बरकळवाडी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. डोंगरी भागातून पाऊलवाटेने ग्रामस्थ, शाळकरी मुलांना ये-जा करावी लागते. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासकीय फंड त्वरित मंजूर करून दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचा लढा उभारल्याशिवाय पर्याय नाही.
- राणी पाटील,
सरपंच, ग्रामपंचायत चाफोडी.


डोंगरी भागातील रस्ता दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. चार पिढ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे स्वप्न पाहिले; पण अजून रस्ता झालेला नाही. रस्त्याचे काम त्वरित करावे, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येणार आहे.
- अर्जुन कोपार्डे,
उपसरपंच बेरकळवाडी

Web Title: How to stop the road?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.