गणित नसेल तर अभियांत्रिकीचे शिक्षण कसे घ्यायचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:21 AM2021-03-14T04:21:37+5:302021-03-14T04:21:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय आवश्यक आहेत. मात्र, ऑल ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय आवश्यक आहेत. मात्र, ऑल इंडिया कौन्सिल फाॅर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने या तिन्ही विषयांत उर्तीण होण्याची अट रद्द केली आहे. मात्र, या बदलामुळे अभियांत्रिकीचा पायाच असणारे विषय जर वगळले तर अभियांत्रिकी(इंजिनिअरिंग) चे शिक्षण कसे घ्यायचे असा सवाल तज्ज्ञांनी केला आहे. तर विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अभियांत्रिकीमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र (पीसीएम) हे विषय घेऊन बारावी उर्तीण झालेला विद्यार्थी अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊ शकत होता. ज्यांना हे तिन्ही विषय जड जात होते. त्यांनाही अभियांत्रिकीला प्रवेश मिळू शकतो. मात्र, गणित हा विषय या शाखेचा आत्मा आहे. हाच जर वगळला तर अभियांत्रिकीचे शिक्षण कसे घ्यायचे? असा सवाल अभियांत्रिकीमधील तज्ज्ञ अभ्यासकांना पडत आहे. हा निर्णय कलात्मक दृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांकरीता घेतला आहे का असा सवालही तज्ज्ञ करीत आहेत. विशेष म्हणजे या बदललेल्या निर्णयानुसार अभ्यासक्रमाच्या एक दोन बॅचेस झाल्यानंतरच त्याचा परिणाम जाणवणार आहे. अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र व गणित हा विषय महत्त्वाचा आहे. अभियांत्रिकीला पहिल्या वर्षी एम-१, एम-२, एम-३ हे गणिताचे व भौतिकशास्त्र हे विषय सक्तीचे आहेत. अकरावी बारावीला हे विषय नसतील तर अभियांत्रिकीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षी उर्तीणच होऊ शकणार नाहीत.
भौतिकशास्त्र म्हणजे अभियांत्रिकी आहे. यातील प्रश्न सोडविण्यासाठी गणिताची गरज लागते. प्रायोगिक तत्त्वावर अशा पद्धतीने कुठे हा अभ्यासक्रम सुरू आहे. त्याची उदाहरणेही द्यावीत. ही अट रद्द करून केवळ ज्यांना हे विषय अवघड जात असतील त्यांनाही अभियांत्रिकीचे शिक्षण घेता येईल. जागा भरावयाची म्हणून हा निर्णय धोकादायक आहे. याबाबत एक दोन बॅचेस पूर्ण झाल्यानंतर हा बदललेला अभ्यासक्रम उपयुक्त आहे की नाही हेही समजेल. या अभ्यासक्रमात दर्जाही महत्त्वाचा आहे तर विद्यार्थ्यांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे. दहावीपर्यंत हे तिन्ही विषय होते. तेच पुढे अभ्यासक्रमात आहेत, असे म्हणणे आहे. त्यामुळे एकूणच या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
कोट
अभियांत्रिकीला पीसीएम ग्रुप महत्त्वाचा आहे. मात्र, एआयसीटीईने कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे, हे माहीत नाही. या अभ्यासक्रमाच्या एक दोन बॅचेस बाहेर पडणे आवश्यक आहे. दर्जाही महत्त्वाचा आहे.
- जयदीप बागी, संचालक, शिवाजी विद्यापीठ , तंत्रज्ञान विभाग
कोट
गणित हा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा पाया आहे. पहिल्या वर्षाला एमवन, एमटू, एमथ्री, फोर असे विषय आहेत. पायाच कच्चा असेल तर विद्यार्थी अनुर्तीण होतील. एअरफोर्स टेक्निकलला प्रवेश मिळू शकणार नाही.
- प्रा. अभिजीत पाटील ,
प्रतिक्रिया
गणिताऐवजी जीवशास्त्र घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही आता अभियांत्रिकीला प्रवेश घेता येईल. अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
सिद्धार्थ पाटील, अभियांत्रिकी विद्यार्थी,
प्रतिक्रिया
दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात तिन्ही विषयांचा अभ्यास झालेला आहे. त्यामुळे अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यानंतर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. त्यामुळे एआयसीटीईने घेतलेला निर्णय निश्चितच चांगला आहे.
- राज पाटील, स्थापत्य अभियंता