स्वच्छ कारभाराच्या गप्पा मारता, मग ‘ब’ वर्ग कसा?
By admin | Published: April 16, 2015 12:29 AM2015-04-16T00:29:28+5:302015-04-17T00:09:01+5:30
संजय पाटील यांची सत्तारूढांना विचारणा : पारदर्शकतेचा बुरखा फाटल्याने परिवर्तन अटळ
राजाराम लोंढे -कोल्हापूर -गेल्या अकरा वर्षांत आदर्श कारभार केल्याचा डांगोरा पिटणाऱ्यांनी पतसंस्थेच्या लेखापरीक्षण अहवालावर बोलावे. पतसंस्थेचा ‘सीडी’ रेशो ११५ टक्के, गुंतवणुकीवर कर्ज उचलून पतसंस्थेला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम सत्तारूढ गटाने केले आहे. स्वच्छ कारभाराच्या गप्पा मारता मग पतसंस्थेचा आॅडिट वर्ग सलग ‘ब’ कसा? अशी विचारणा पतसंस्थेचे माजी सभापती व राजर्षी शाहू परिवर्तन महाआघाडीचे नेते संजय डी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
संजय पाटील म्हणाले, पतसंस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात गंभीर शेरे मारले आहेत. १९५ कोटींच्या ठेवींवर किमान ५५ कोटी गुंतवणूक गरजेची होती, पण या मंडळींनी २८ कोटी गुंतवणूक केली तीही तारण देऊन कॅश क्रेडिट उचलले आहे.
ठेवी व कर्जाचे गुणोत्तर प्रमाण ११५ टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी भयानक अवस्था पतसंस्थेची केल्यानेच लेखापरीक्षण अहवालात ताशेरे ओढले आहेत. रिकरिंग व शेअर्स ठेव कमी व्याजाने घेऊन ती सभासदांनाच १२.५ टक्क्यांनी दिली जाते, वर्षाला पाच कोटी रुपये सभासदांचे नुकसान होते, हीच दादा लाड यांची पारदर्शकता काय? शेजारील जिल्ह्णातील माध्यमिक शिक्षकांच्या पतसंस्थेचा कारभार पाहिला तर सत्तारूढ मंडळींची धूळफेक लक्षात येते. ५५ लाख रुपये खर्च करूनही सर्व शाखांत संगणकीकरण पूर्ण झालेले नाही. संघटनांच्या नेत्यांनी नोकरभरती केल्याची टीका दादा लाड करत आहेत, पण यांनी काय केले. साडेआठ हजार सभासदांना सव्वा कोटी लाभांश आणि ५४ कर्मचाऱ्यांचा दीड कोटी पगार होत असल्याने नोकरभरतीऐवजी कर्जाचा व्याजदर १२ टक्के करावा, अशी मागणी आमची होती पण लाड यांनी बहुमताच्या जोरावर भरतीचा घाट घातला, त्याविरोधात न्यायालयीन लढाई केली, चुकीची माहिती देऊन न्यायालयाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही सबळ पुरावे दिल्याने स्थगिती मिळाली. अशा मंडळींना संघटनेच्या भरतीवर बोलण्याचा नैतिक अधिकार काय? या प्रश्नांची जाहीर सभांमधून विचारणा करूनही दादांची बोलती बंद का ? असा खडा सवालही पाटील यांनी केला. महाआघाडीला खिचडी म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, आम्हाला सत्तेची हाव कधीच नव्हती आणि नाही, पण आठ हजार सभासदांची संस्था वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाऱ्यांची बुरखा फाटला असून सूज्ञ सभासदांनी अशा प्रवृत्तीला बाजूला करण्याचे ठरविल्याने परिवर्तन अटळ असल्याचेही त्यांनी सांगितले.