दोषारोपपत्र दाखल नसताना बदली कशी?
By admin | Published: December 4, 2015 12:44 AM2015-12-04T00:44:56+5:302015-12-04T00:55:10+5:30
पोलीसप्रमुखांच्या बदलीप्रश्नी भाकपचा सवाल : समीर गायकवाडने ब्रेन मॅपिंगसाठी संमती द्यावी; ‘सनातन’वर बंदी घाला
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पकडण्यात आलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडचा पूर्ण तपास होऊन अजून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. अशा परिस्थितीत जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांची बदली शासनाने कशी केली? असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सतीशचंद्र कांबळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. शासन खुन्यांच्या बाजूचे आहे; त्यामुळे तपासावर परिणाम व्हावा, यासाठीच डॉ. शर्मा यांची बदली केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
कांबळे म्हणाले, अॅड. पानसरे यांच्या हत्येच्या तपासात डॉ. शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दबाव झुगारून त्यांनी समीरला अटक केली. शासनाने शर्मांची अचानकपणे बदली केली. शर्मा यांनी विनंती केल्यानेच बदली झाली आहे, असे समजले आहे. मात्र, अॅड. पानसरे यांच्या हत्येचा तपास अर्धवट असताना शासनाने त्यांची विनंती त्वरित मान्य करून त्यांची बदली केली कशी ?
समीर गायकवाड खुनी नाही, असे सनातन संस्थेचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टर, पॉलिग्राफ चाचण्यांना संमती द्यावी. वकीलपत्र घेतलेल्या वकिलांनी समीरला या चाचण्यांसाठी संमती देण्यास सांगावे. समीरने पोलिसांवर २५ लाखांचा खोटा आरोप करून दिशाभूल केली आहे. त्याला न्यायालयात घेऊन जाताना आम्ही पाठोपाठ होतो. त्यावेळी समीर कोणत्याही पोलिसाशी बोलताना दिसून आला नाही. असे असताना संभ्रम वाढविण्यासाठी समीरने आरोप केले आहेत.
‘सनातन’चे अभय वर्तक पुरोगामी संघटनांवर आरोप करीत आहे. सनातन संस्था समाजविघातक कारवाया करीत असते. सन २००८ मध्ये ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातही ‘सनातन’चा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाशीतील बॉम्बस्फोटात ‘सनातन’च्या सहा साधकांवर आरोप आहेत.
आरोप असलेले रुद्र पाटील (सांगली), प्रवीण लिमकर (कोल्हापूर), सारंग अकोलकर, जयप्रकाश उर्फ अण्णा यांना फरार घोषित केले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या खुनातील आरोपीही ‘सनातन’शी संबंधित असल्याचे पुढे आले आहे. ही पार्श्वभूमी असल्यामुळेच सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत, असे कांबळे म्हणाले. अॅड. पानसरे, डॉ. दाभोलकर, डॉ. कलबुर्गी यांच्या खून प्रकरणाचा तपास गतीने करावा. यावेळी अनिल चव्हाण, दिलदार मुजावर, प्रशांत आंबी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)