बँका सुरू ठेवून कोरोनाची साखळी कशी तुटेल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:23 AM2021-05-14T04:23:49+5:302021-05-14T04:23:49+5:30
रमेश पाटील कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारपासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊनमध्ये सर्वच क्षेत्रांतील बँकांचा समावेश करावा, अशी ...
रमेश पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारपासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊनमध्ये सर्वच क्षेत्रांतील बँकांचा समावेश करावा, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनेमधून होऊ लागली आहे. बँका सुरू ठेवून कोरोनाची साखळी कशी तुटेल? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. बँक सेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडते; पण ही सेवा देताना अनेक कर्मचारी बाधित झाले, तर काहींचा मृत्यू झाला. त्यामुळे कडक लॉकडाऊनमध्ये बँकांचा समावेश करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
सध्या लॉकडाऊन असला तरी बँकांमधील गर्दी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पेन्शन, पगार, ठेवीवरचे मासिक व्याज आणि शासकीय अनुदानाची जमा झालेली रक्कम काढण्यासाठी बँकांत मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी ठरते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात काही दिवस बँका बंद कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.
आपत्ती व्यवस्थापन नियमानुसार प्रत्येक जिल्ह्यात बँकांचे कामकाज चालू ठेवण्याचा अथवा बंद ठेवण्याचा अधिकार जिल्ह्यातील बँकर्स कमिटीला असतो. या कमिटीचे जिल्हाधिकारी व लीड बँकेचे अधिकारी सदस्य असतात. एखाद्या आपत्ती काळात ते बँका चालू - बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात. असाच निर्णय सध्या शनिवारपासून होणाऱ्या कडक लॉकडाऊनमध्ये बँकांबाबत घ्यावा, अशी मागणी होत आहे.
सध्या बँकांचे दैनंदिन कामकाज सकाळी १० ते २ या वेळेत ५० टक्के कर्मचारीवर्गावर सुरू आहे. मात्र, या वेळात बँकांत तुडुंब गर्दी होते. जर बँका लॉकडाऊन काळात बंद झाल्या, तर होणारी गर्दी टळेल. शिवाय या काळात बँका बंद राहिल्या तरीही बँकांचे ग्राहक ऑनलाइन व्यवहार करू शकतात. या सर्व गोष्टींचा विचार करून या लॉकडाऊनमध्ये बँकांचा समावेश करावा, अशी मागणी बँक कर्मचारी युनियनमधून होत आहे.
चौकट:
बँका बंद ठेवता येतात
गेल्या एक वर्षाहून अधिक काळात लॉकडाऊनमध्येही बँकांनी ग्राहकांना सेवा दिली आहे. ही सेवा देत असताना अनेक कर्मचारी कोरोनाने बाधित झाले. काहींचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने बँक कर्मचाऱ्यांना कोरोनायोद्धा म्हणून संबोधले आहे. सध्या बँका सुरू असल्याने बँकेत ग्राहकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात होते. जर ही गर्दी कमी करायची असेल व कोरोनाची साखळी तोडायची असेल, तर लॉकडाऊनच्या काळात काही दिवस बँका बंद ठेवणे गरजेचे आहे.
-सूर्यकांत कर्णिक
ऑ. सेक्रेटरी, सरकारी बँक कर्मचारी युनियन