महापौर माळवींचा राजीनामा मी कसा घेणार : राजू जाधव
By admin | Published: February 15, 2015 12:54 AM2015-02-15T00:54:07+5:302015-02-15T01:04:53+5:30
जबाबदारी पक्षाची : राष्ट्रवादीच्या नेत्यांना न भेटल्याचा दावा
कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. त्यांचा राजीनामा मी कसा घेणार, अशी विचारणा येथील पॉप्युलर स्टील वर्क्सचे राजू जाधव यांनी शनिवारी केली. दिवसभरात राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्यांना मी भेटलेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महापौर माळवी यांच्या राजीनामा प्रकरणास वेगळेच वळण लागले असून, सोमवारी त्या राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर तृप्ती माळवी यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी पॉप्युलर स्टील वर्क्सचे संचालक व उद्योजक राजू जाधव यांच्यावर शनिवारी सोपवली. श्री.जाधव हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. आमदार हसन मुश्रीफ, आर. के. पोवार व राजू लाटकर या तिघांनी राजू जाधव यांच्या प्रतिभानगरातील निवासस्थानी दुपारी साडेतीन वाजता जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. महापौरपदी निवड व्हावी म्हणून राजू जाधव यांनी माळवी यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यामुळे राजीनामा घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे व ती त्यांनी स्विकारली असून आज, रविवारीच ते माळवीं यांच्याशी संपर्क साधतील अशी माहिती आर. के. पोवार यांनी सायंकाळी पत्रकारांना दिली.
या नेत्यांत नेमकी काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ ने उद्योजक राजू जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरची कथित भेटच झाली नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘जपान मधील एका मोठ्या उद्योग समुहाचे एक शिष्टमंडळ उद्योग विस्तारासंबंधीची चर्चा करण्यासाठी कोल्हापुरात आले आहे. त्यामुळे दिवसभर मी त्यांच्यासमवेतच होतो. याकाळात मला कुणाचा मोबाईलही घेता आलेला नाही. आज, रविवारीही मला त्यांना घेवून बेळगावला जायचे आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभरात मी कुणाशी भेटलेलो नाही. दुसरे असे की मी माळवी यांना महापौर करा अशी विनंती केली असली तरी ते पद देण्याचा निर्णय पक्षाचा होता. त्यामुळे त्यांचा राजीनामा पक्षानेच घ्यावा. मी त्यामध्ये कांहीच हस्तक्षेप करु इच्छित नाही व करणारही नाही.’
महापौरांचा राजीनामा घेतला, महापौर राजीनामा देणार, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना आणि ज्यांच्या गटाचे नवे महापौर होणार, अशा कॉँग्रेसच्या नेत्यांना महापौर माळवी यांनी अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा ठेंगा दाखविला. सोमवारच्या महापालिकेच्या सभेत राजीनामा देण्याचे ठरल्यानंतर सभेचा अजेंडा प्रसिद्ध झाला; पण या सभेदिवशीच महापौरांनी रजा घेतल्यामुळे राजीनामा न देण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला आहे. दरम्यान, राजीनामा देण्यासाठी महापौरांवर शनिवारी दिवसभर दबाब आणण्यात येत होता; परंतु ‘स्विच आॅफ’ असलेल्या माळवी यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही.