महायुतीला दोन आवळे आव्हान कसे देणार ?

By admin | Published: June 17, 2014 01:42 AM2014-06-17T01:42:38+5:302014-06-17T01:44:28+5:30

उमेदवार निश्चित : जयवंतराव आवळे उतरल्यास चुरस; यावेळीही गटातटाच्या राजकारणालाच येणार महत्त्व

How will the Mahavati challenge the two? | महायुतीला दोन आवळे आव्हान कसे देणार ?

महायुतीला दोन आवळे आव्हान कसे देणार ?

Next

दत्ता बीडकर /हातकणंगले
हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघात उमेदवार ठरलेले आहेत. गेली वर्षभर मतदारसंघात छुप्या प्रचाराला सुरुवातही झाली आहे. २००४ च्या निवडणुकीपासून हा मतदारसंघ काँग्रेस पक्षापासून दुरावलेला आहे. २००४ ला जनसुराज्य, तर २००९ ला शिवसेना या मतदारसंघातून विजयी झाल्यामुळे गेली पंचवीस वर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ गेल्या दहा वर्षांत खिळखिळा झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले भरघोस मताधिक्य आणि शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकर यांचा विकासकामांबरोबर मतदारसंघातील लोकसंपर्क पाहता यावेळी काँग्रेसकडून माजी मंत्री आणि माजी खासदार जयवंत आवळे नशीब अजमाविण्याची शक्यता आहे, तर जनसुराज्य पक्षाकडून माजी आमदार राजीव आवळे पुन्हा एकदा तयारीला लागल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत निश्चित आहे. मात्र, दोन्ही आवळेंच्या भांडणाचा लाभ आमदार मिणचेकर यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
हातकणंगले अनुसूचित जाती मतदारसंघामध्ये गेली पंचवीस वर्षे काँग्रेसचे जयवंतराव आवळे विजयी होऊन रौप्यमहोत्सवी आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी वर्णी लावली. वारणा उद्योगसमूहाचे नेते आमदार विनय कोरे यांच्या पाठबळावर २००४ मध्ये राजीव किसनराव आवळे विजयी झाले. या निवडणुकीमध्ये तालुक्यामध्ये असलेले काँग्रेसचे आवाडे गट आणि महाडिक गट छुप्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात गेले. त्यानंतर काँग्रेस अंतर्गत गटबाजी उफाळून आली.
२००९ च्या निवडणुकीमध्येही पुन्हा काँग्रेसमधील बंडाळी उफाळून आली. याचा फायदा शिवसेना उमेदवार सुजित मिणचेकर यांना झाला. पहिल्यांदा या मतदारसंघात भगवा फडकला गेला. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यामुळे, तसेच काँग्रेस अंतर्गत उडालेल्या बंडाळीमुळे या निवडणुकीत जयवंतराव आवळे यांचे पुत्र राजू जयवंत आवळे आणि जनसुराज्य पक्षाचे राजीव किसनराव आवळे पराभूत झाले. या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा जातीचे राजकारण उफाळून आले. राजू जयवंत आवळे आणि राजीव किसन आवळे हे मातंग समाजाचे, तर शिवसेना उमेदवार डॉ. मिणचेकर हे बौद्ध समाजाचे. त्यामुळे भीमशक्ती एकवटली आणि अटीतटीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर अवघ्या २००४ मतांनी विजयी झाले.
आगामी विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा चुरशीची होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. शिवसेना-भाजपच्या जोडीला स्वाभिमानी शेतकरी संघटना असल्यामुळे हातकणंगले मतदारसंघामध्ये यावेळीही मोठ्या प्रमाणात गटा-तटाच्या राजकारणाला महत्त्व येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारचा लाभ यावेळी शिवसेना उमेदवारांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्षाकडून यावेळी जयवंतराव आवळे यांना उतरविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्री असताना तसेच त्यांनी गेली पंचवीस वर्षे ठेवलेला लोकसंपर्क पाहता आजही त्यांना जनतेची सहानुभूती आहे. मात्र, काँग्रेस अंतर्गत असलेली मोठी गटबाजी विधानसभेपूर्वी वरिष्ठ पातळीवर संपविण्यासाठी जयवंतराव आवळे आघाडीवर आहेत. यासाठीच त्यांनी लोकसभेला काँग्रेस उमेदवार कलाप्पाण्णा आवाडे यांचा हिरिरीने प्रचार सांभाळला. आमदार महादेवराव महाडिक गटाबरोबरही त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवून येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजयासाठी धडपड सुरू ठेवली आहे.
जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे यांनीही मतदारसंघात गेल्या एक वर्षापासून गाठीभेटी घेऊन गावोगावी जनसंपर्क वाढविला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करताना फक्त लोकसभेसाठी आमची मदत
राहील. विधानसभेला ‘आमचा, पक्ष आमचे विचार वेगळे राहतील’, असे ते आवर्जून सांगत असल्यामुळे त्यांनी विधानसभेची तयारी सुरू ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार कलाप्पाण्णा आवाडे यांच्यासाठी या मतदारसंघामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी-जनसुराज्य असे तीन पक्ष एकदिलाने काम करीत होते. गावपातळीवरील नेते काँग्रेस उमेदवाराच्या सभासमारंभाला, प्रचार फेऱ्यांत आघाडीवर होते. असे असतानाही महायुतीचे उमेदवार खा. राजू शेट्टी यांना हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४८,१२१ मतांचे मताधिक्य मिळाले.
या मताधिक्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि जनसुराज्यने धडा घेण्याची गरज आहे. (उद्याच्या अंकात चंदगड मतदारसंघ)
 

Web Title: How will the Mahavati challenge the two?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.