‘स्वाभिमानी’चा कस लागणार

By admin | Published: October 12, 2015 11:38 PM2015-10-12T23:38:12+5:302015-10-13T00:03:47+5:30

‘एफआरपी’ एकरकमी हवी : सह्यांच्या मोहिमेला प्रतिसाद, ऊसदरप्रश्नी कारखान्यांबाबत शेतकऱ्यांत संताप

How will the 'self-respect' be? | ‘स्वाभिमानी’चा कस लागणार

‘स्वाभिमानी’चा कस लागणार

Next

गणपती कोळी - कुरूंदवाड--ऊस उत्पादन खर्च व दर याचा ताळमेळ बसत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम तीन टप्प्यांत देण्याच्या चर्चेमुळे शेतकरी भडकला आहे. या प्रश्नाला न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रीय झाली असून, थंडावलेल्या संघटनेला या निमित्ताने संधी मिळाली आहे. ‘एफआरपीची रक्कम एकरकमी हवी’ या मागणीचे स्वाभिमानीकडून मिळालेल्या अर्जाला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. १६) साखर संचालक कार्यालयावर होणाऱ्या मोर्चावर शेतकऱ्यांबरोबर स्वाभिमानीचाही कस लागणार आहे.बारमाही वाहणाऱ्या नद्या, सुपीक जमीन, योग्य हवामान यामुळे पश्चिम महाराष्ट्र विशेषत: कोल्हापूर, सांगली, कर्नाटक सीमा भाग ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच अभ्यासू व कष्टाळू शेतकऱ्यांमुळे चांगल्या उताऱ्याचे विक्रमी उत्पादन शेतकरी घेत आहेत. त्यामुळे या भागात साखर कारखानदारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
उसाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी खा. राजू शेट्टी यांचे नेतृत्व शेतकऱ्यांना मिळाले. आंदोलनातून उसाच्या दराबाबत योग्य मागणी, योग्यवेळी थांबण्याची भूमिका व विश्वासात्मक तडजोड हे खा. शेट्टी यांनी अंगिकारल्याने ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिला. यातून उसाला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. शिवाय नेतृत्वाची उतराई
म्हणून खा. शेट्टी यांना राजकारणात व्होट बरोबर नोटही देत जिल्हा
परिषद, आमदार, दोनवेळा खासदार करून शेतकऱ्यांनी इमानीपणा दाखविला.
यंदा गळीत हंगाम चालू होण्यापूर्वीच साखर कारखानदारांनी एफआरपी (किमान लाभकारी मूल्य)ची रक्कम तीन टप्प्यांत देण्याची भूमिका घेतल्याने मुळातच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अधिकच भडकला आहे. याच संधीचा फायदा घेत थंडावलेल्या स्वाभिमानी संघटनेने पुन्हा आंदोलनाची डरकाळी फोडली आहे. ऊसदर नियंत्रण अध्यादेश १९६६ नुसार एफआरपी कायद्याप्रमाणे एकरकमी मिळावी, याबाबत शेतकऱ्यांना स्वाभिमानीने लेखी अर्ज दिले असून, सदर अर्ज भरून साखर सहसंचालकांना मोर्चाद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे.
कारखान्याचा संचालक असला तरी तीन हप्त्यांमधील रक्कम न परवडणारी असल्याने स्वाभिमानीच्या या अर्जाला गावागावांतून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा या मागणीसाठी खा. शेट्टी यांचा हात धरला असून, शुक्रवारी
(दि. १६) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावरील मोर्चानंतर होणाऱ्या निर्णयावर शेतकऱ्यांबरोबर स्वाभिमानीचाही कस लागणार आहे.

शेतकरी अरिष्टात : गत हंगामात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
गेल्या गळीत हंगामापासून उत्पादन खर्च वाढल्याने व उताऱ्यात घट आल्याने तसेच पहिली उचलही वेळेवर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अरिष्ठात सापडला आहे.
त्यातच खा. शेट्टी यांनी राजकारणातच अधिक लक्ष केंद्रित केल्याने व सत्ताधाऱ्यांशी राजकीय सोयरिक केल्याने त्यांची कोंडी झाली आहे. परिणामी, गत गळीत हंगामातील आंदोलनाबाबत शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
शिवाय वर्षभरात स्वाभिमानीमध्ये झालेली पडझड, आमदार उल्हास पाटील यांनी स्वाभिमानीला ठोकलेला रामराम अन् विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश यामुळे स्वाभिमानी थंडावली होती.

Web Title: How will the 'self-respect' be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.