बारावीची परीक्षा बुधवारपासून, तयारी पूर्ण; कोल्हापूर विभागातून सुमारे १ लाख २९ हजार परीक्षार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 06:37 PM2018-02-19T18:37:17+5:302018-02-19T18:46:40+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवार (दि. २१) पासून सुरू होणार आहे. यात सकाळी अकरा ते दोन या वेळेत पहिला पेपर इंग्रजीचा होणार आहे. कोल्हापूर विभागातून यावर्षी सुमारे एक लाख २९ हजार ९३९ परीक्षार्थी आहेत.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवार (दि. २१) पासून सुरू होणार आहे. यात सकाळी अकरा ते दोन या वेळेत पहिला पेपर इंग्रजीचा होणार आहे. कोल्हापूर विभागातून यावर्षी सुमारे एक लाख २९ हजार ९३९ परीक्षार्थी आहेत.
या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर विभागातील १५४ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यासाठी कोल्हापूरमध्ये ६१, सातारा जिल्ह्यात ४५ आणि सांगली जिल्ह्यात ४८ परीक्षा केंद्रे आहेत. ही परीक्षा दि.२० मार्चपर्यंत होणार आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी परीक्षा मंडळाने कोल्हापूर विभागाने एकूण १९ भरारी पथके नेमली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी सात आणि सांगली व सातारा जिल्ह्यांसाठी प्रत्येकी सहा भरारी पथके कार्यान्वित असणार आहेत. त्यासह प्रत्येक जिल्हा प्रशासनाची भरारी पथके असणार आहेत. त्यासह दक्षता पथकेदेखील गोपनीय पद्धतीने कार्यरत असतील. परीक्षा केंद्रांवर शांततेत प्रवेश करण्याच्या सूचना भरारी पथकांना दिल्या आहेत, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाच्या सचिव पुष्पलता पवार यांनी दिली.
मोबाईल बंदी
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर मोबाईल बंदी आहे; पण केंद्रांवरील सर्व पर्यवेक्षकांनाही मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी आपले मोबाईल केंद्र संचालक यांच्याकडे जमा करायचे आहेत. पर्यवेक्षकांना परीक्षा कालावधीत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रत्येक केंद्र संचालकांचे नंबर पर्यवेक्षकांना यापूर्वीच दिले आहेत. त्यांनी तो घरामध्ये देण्याचा आहे. गरज पडल्यास केंद्र संचालकांना संपर्क साधावयाचा आहे.
परीक्षार्थींनी अर्धा तास आधी यावे
परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पेपरपूर्वी अर्धा तास हजर होणे आवश्यक आहे. अकरा वाजता पेपर असलेल्या परीक्षार्थींना साडेदहा वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाच्या सचिव पुष्पलता पवार यांनी दिली. १०.४० वाजता उत्तरपत्रिका आणि १०.५० वाजता प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. दहा मिनिटांत त्यांनी प्रश्नपत्रिका वाचून घ्यावी.
अकरा वाजता लिहिण्याची परवानगी दिली जाईल. दुपारी तीनच्या पेपरसाठी परीक्षार्थींना २.३० वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. २.४० वाजता उत्तरपत्रिका देण्यात येईल. त्यानंतर २.५० वाजता प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. दहा मिनिटांत त्यांनी प्रश्नपत्रिका वाचून घ्यावी. तीन वाजता लिहिण्याची परवानगी दिली जाईल. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तणावविरहित परीक्षा द्यावी. परीक्षेबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकांशी चर्चा करावी, असे आवाहन सचिव पवार यांनी केले आहे.
जिल्हानिहाय परीक्षार्थी
- *कोल्हापूर : ३५९४
- *सांगली : ३६८३५
- *सातारा : ३९५१०
हेल्पलाईनची सुविधा
दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करण्यासह त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने जिल्हानिहाय समुपदेशकांच्या माध्यमातून हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यासह विभागीय मंडळाच्या कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून, त्यासाठी दूरध्वनी क्रमांक (०२३१-२६९६१०१, २६९६१०२, २६९६१०३) यावर सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
जिल्हानिहाय समुपदेशक असे
- * कोल्हापूर : भीमगोंडा पाटील (९९२३१४९०३९)
- * सांगली : सुरेखा माने (९९२२३५३७५२)
- * सातारा : शांतीनाथ मल्लाडे (९९२२२११५६४)