आजऱ्याच्या बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:34+5:302021-06-16T04:32:34+5:30
आजरा : आजऱ्यातील बाजारपेठेत नागरिकांनी आज खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. याबाबत प्रशासनाने दुकानदारांनी कोरोनाचा स्वॅब तपासून घ्या अन्यथा ...
आजरा
: आजऱ्यातील बाजारपेठेत नागरिकांनी आज खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. याबाबत प्रशासनाने दुकानदारांनी कोरोनाचा स्वॅब तपासून घ्या अन्यथा दुकाने बंद करा, असा फतवा काढल्यामुळे दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली. कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात वाढत असताना आजऱ्याच्या बाजारपेठेत झालेली गर्दी भविष्यकाळातील धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्याचा गैरफायदा उठवत आजऱ्याच्या बाजारात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. शेतकरी राजाही बी-बियाणे, खते, औषधे खरेदीसाठी बाजारात दाखल झाला होता. भाजीपाला, किराणा व अन्य साहित्य खरेदीसाठी नागरिक आल्यामुळे बाजारपेठेत गर्दी झाली होती.
आजरा व परिसरात सोमवारचा दिवस शेतीकामासाठी पाळत असतो. त्यामुळे आजऱ्याच्या बाजारपेठेत गर्दी झाली होती. अनेक नागरिकांनी बाजारपेठेत कोरोनाचे सर्व निर्बंध डावलून बाजारपेठेतच वाहने घातल्यामुळे गर्दीमध्ये आणखीन वाढ झाली. नगरपंचायतीने मुख्य बाजारपेठेत वाहने येण्याचे सर्व मार्ग बंद केल्यानंतरही ते अडथळे दूर करून वाहनधारकांनी आपली वाहने दुकानाच्या दारात उभी केली होती.
पोलिस व नगरपंचायत प्रशासनाने आजरा शहरासह तालुक्यात सर्व प्रकारचे दुकानदार, पतसंस्था, दूध संस्थेमधील कर्मचारी, दक्षता कमिटीचे सदस्य यांनी कोरोनाचा स्वॅब तपासून घ्यावा. त्यानंतरच आपले व्यवसाय उघडण्यास परवानगी आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
आज आजऱ्यातील व्यापाऱ्यांना स्वॅब तपासून घेण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले. अनेक व्यापाऱ्यांनी याला विरोध केला. नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांकडे धाव घेतली. मात्र नगरपंचायत प्रशासनाने वरिष्ठांच्या आदेशानुसार स्वॅब तपासून घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले.
-------------------------
*
नगरपंचायत कर्मचारी कुठे कुठे उभे करायचे
नगरपंचायतचे कर्मचारी बाजारपेठेत गर्दी करू नका, औषध फवारणी, स्वच्छता, कोरोना सेंटरमध्ये काम करणे, मार्ग बंद करणे, कंन्टेनमेंट झोनसाठी काम करणे ही सर्व कामे करीत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. नागरिकांनी स्वंयप्रेरणेने कोरोनाचे नियम पाळावेत, असेही आवाहन नगरपंचायतीतर्फे केले आहे.