लॉकडाऊन उठताच बाजारपेठेत प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:21 AM2021-04-13T04:21:39+5:302021-04-13T04:21:39+5:30
कोल्हापूर : विकेंड लॉकडाऊन संपताे ना संपतो तोच पुन्हा दोन दिवसानंतर पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागणार असल्याच्या शक्यतेने कोल्हापूर बाजारपेठेत ...
कोल्हापूर : विकेंड लॉकडाऊन संपताे ना संपतो तोच पुन्हा दोन दिवसानंतर पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागणार असल्याच्या शक्यतेने कोल्हापूर बाजारपेठेत सोमवारी खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली. दोन दिवस सुनेसुने वाटणारे शहरातील रस्ते पुन्हा गर्दीने फुलून गेले. त्यामुळे गर्दीच्या रेट्याने दुपारपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झाली.
शनिवार व रविवार असे दोन दिवस कोल्हापुरकरांनी कडकडीत लॉकडाऊन पाडला, प्रशासनाच्या आदेशाला मान दिला. शहरवासीयांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले. सोमवारी सकाळी सात वाजता विकेंड लॉकडाऊनची मुदत संपली, आणि कोल्हापूरकर घराबाहेर पडले. दैनंदिन भाजीपाला, दूध, बेकरीचे पदार्थ घेण्यासाठी रस्त्यावर आले. हळूहळू सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील सर्वच प्रकारची दुकाने उघडण्याची लगबग सुरु झाली.
सकाळी साडेदहा वाजेपर्यंत शहरातील सर्व भागातील सर्व प्रकारची दुकाने उघडली. परंतु जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून अन्य दुकाने उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या पथकांनी शहरात फेरफटकामारुन अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून अन्य दुकाने बंद ठेवावीत, कारवाईसारखा प्रसंग टाळा, असे आवाहन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पापाची तिकटी चौकात व्यापारी प्रतिनिधी व महापालिकेचे अधिकारी आमने सामने येऊन त्यांच्यात युक्तिवाद सुरु झाला. सर्व दुकाने सुरु ठेवण्यावर व्यापारी ठाम होते, तर बंदी घातलेली दुकाने उघडता येणार नाहीत यावर ठाम राहिले.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन चेंबर ऑफ कॉमर्सचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना भेटले. गुढीपाडव्याचा सण आहे, या सणावेळी मोठी उलाढाल होते, व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला असून तो विकण्यास दोन दिवसांचा अवधी द्यावा, अशी विनंती चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. मात्र शासनाच्या नियमांचे पालन करावेच लागेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दुपारी तीन वाजल्यानंतर शहरातील सर्वच प्रकारची दुकाने सुरु झाली. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली. ही गर्दी दिवसभर कायम राहिली. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मात्र शहरवासीयांनी मास्क लावण्याचे तसेच शारीरिक अंतर राखण्याचे सौजन्य मात्र दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु गर्दीच मोठी झाल्याने शारीरिक अंतर काही राखता येत नव्हते. मात्र त्याकडे सर्वांनीच कानाडोळा केला.
पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीने गर्दी-
गेल्या दोन दिवस राज्य सरकारच्या पातळीवर सुरु असलेल्या बैठका, कोरोनाची गंभीर होत चाललेली परिस्थिती यामुळे राज्यात किमान चौदा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येऊ लागल्याने कोल्हापूर शहरातील गर्दीत आणखी भर पडली. जर चौदा दिवस घरात बसावे लागले तर मात्र कुचंबणा होऊ नये म्हणून अनेकजण जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाहेर पडले होते. काही ठिकाणी दुकानासमोर रांगा लागल्याचेही चित्र होते,