पिंपळगाव खुर्दमध्ये डिटोनेटरचा प्रचंड स्फोट
By admin | Published: October 1, 2016 12:39 AM2016-10-01T00:39:52+5:302016-10-01T00:40:52+5:30
परिसरात आवाजाने कानठळ््या : डेटोनेटरचा लाखो रुपयांचा साठा; गोडावून इमारत, भुयारी बंकरसदृश तळमजलाही उद्ध्वस्त
कागल : विविध प्रकारच्या खुदाई कामाकरिता ‘भूसुरुंग’ उडविण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या ‘डेटोनेटर’ला आग लागल्याने प्रचंड मोठा स्फोट झाला. पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथे शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. स्फोटानंतर झालेल्या प्रचंड मोठ्या आवाजाने कागल परिसरातील सर्व गावांतील लोक भीतीने मोठ्या प्रमाणात घराबाहेर आले होते. पाच किलोमीटर परिसरात ही स्थिती असताना मध्यरात्रीची नीरव शांतता भेदत हा आवाज १५ ते २० किलोमीटरच्या परिघातही ऐकावयास मिळाला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डेटोनेटरचा लाखो रुपयांचा साठा उद्ध्वस्त होण्याबरोबरच गोडावून इमारत आणि साठवणुकीसाठी बांधलेले भुयारी बंकरसदृश तळमजलाही उद्ध्वस्त झाला. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
कागलमध्ये राहणारे झाकीरहुसेन पीरमहंमद मन्सुरी, फारुखहुसेन पीरमहंमद मन्सुरी यांच्या मालकीचे हे गोडावून आहेत. खुदाईसाठी भूसुरुंग उडवून देण्याचा व्यवसाय ते करतात. त्यासाठी लागणारा डेटोनेटर, जिलेटिन, इतर रासायनिक पदार्थांचा साठा करण्यासाठी पिंपळगाव खुर्द गावच्या हद्दीत, पण गावापासून तीन ते चार किलोमीटर दूर डोंगरात जवळपास १२ एकर परिसरात कपौंड करून येथे तीन लहान-लहान गोडावून तयार केली आहेत. त्यापैकी एका गोडावूनमध्ये हा स्फोट झाला. या ठिकाणी वॉचमन आणि देखरेखीचे काम करणारे दाम्पत्य प्रवेशद्वाराजवळच्या खोलीत झोपले होते. आवाजानंतर ते भयभयीत होऊन तेथून पळून गेले. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता तीन सेकंदाच्या कालावधीच्या कानठळ््या बसविणारा प्रचंड आवाज घुमला आणि आकाशात आगीचा एकच लोट फेकला गेला. तसेच इमारतीचे दगड, स्लॅबचे तुकडे, सळ््या, जळलेले साहित्य चोहोबाजूला उडून गेले. घटनेची माहिती मालक मन्सुरी यांनी कागल पोलिसांत दिल्यानंतर अर्ध्या तासात पोलिस निरीक्षक यशवंत गवारी, उपनिरीक्षक दीपक वाकचौरे पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रात्रभर आणि शुक्रवारी दिवसभर विविध वरिष्ठ अधिकारी, त्यांची पथके यांनी घटनास्थळी भेटी देत घटनेची माहिती घेतली. नागरिकांचीही गर्दी झाली होती, तर घटना घडल्यापासून सकाळपर्यंत पोलिस ठाणे, माध्यमांचे प्रतिनिधी यांना फोन करून लोक वस्तुस्थिती जाणून घेत होते. सोशल मीडियावरही विविध संदेश या घटनेबद्दल फिरत होते. देशाच्या सीमेवर झालेली युद्धसदृश परिस्थिती आणि मध्यरात्रीचा हा प्रचंड आवाजामुळे ही भीतीयुक्त उत्सुकता अधिकच वाढल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)
पोलिस अधीक्षकांसह पथकांच्या भेटी
कागल पोलिसांनी स्फोटकांच्या गोडावूनमध्ये स्फोट झाल्याने रात्रभर येथे थांबणे पसंत केले, तर शुक्रवारी सकाळी एस.आय.टी., ए.टी.एस. आणि बी.डी.डी.एस. बॉम्ब प्रतिबंधक पथक आले होते. त्यांनी सखोल चौकशी केली. श्वानपथक व बॉम्ब निकामी करण्याची यंत्रणाही सोबत घेऊन आले होते. जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे यांनीही घटनास्थळी भेट दिली, तर उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह जाधव, तहसीलदार किशोर घाडगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी येथे दिवसभर हजर होते.
स्फोटाची तीव्रता
डेटोनेटर ठेवण्याचे ठिकाण पूर्ण भुईसपाट झाले आहे. मध्यरात्रीच्या आवाजाने या घटनेची तीव्रता वाढविली. रात्री अंधारात काहीच कळत नव्हते. सकाळी मात्र घटनास्थळीच्या भोवती स्लॅबच्या तारा, सिमेंट, खडीसह पडल्याचे दिसत होते. कागल, पिंपळगाव, कणेरी, खेबवडे, करनूर, कोगनोळी या सभोवतालच्या गावात तर प्रचंड आवाज आलाच, पण जोरदार धक्काही जाणवला. अगदी कोल्हापूर, निपाणी, हुपरीपर्यंत आवाज आल्याचे लोकांनी सांगितले. कागल परिसरात खिडक्यांच्या काचा फुटल्याच्याही तक्रारी आहेत.