लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यास भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:43+5:302021-03-04T04:44:43+5:30
हातकणंगले : येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील इचलकरंजी पॉवर लूम मेगा कल्स्टर कारखान्याच्या बॉयलरला मंगळवारी दु. १२ वाजता भीषण आग ...
हातकणंगले : येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील इचलकरंजी पॉवर लूम मेगा कल्स्टर कारखान्याच्या बॉयलरला मंगळवारी दु. १२ वाजता भीषण आग लागली. या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. बॉयलरजवळ असलेल्या ऑइल टँकला तसेच जवळच असलेल्या सुमारे दगडी कोळसा साठ्याला आग लागल्याने धुराचे लोट सगळीकडे पसरले होते. परिसरातील ८ अग्निशामक बंबांनी आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये नेमके किती नुकसान झाले, याची अधिकृत माहिती मिळाली नाही.
लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील गणेश स्पिनिग मिलच्या जागेवर इचलकरंजी पावर लूम मेगा कलस्टर कारखानाला भीषण आग लागल्याची माहिती कारखाना प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व अग्निशामक दलाला दिली. इचलकरंजी नगरपालिकेचे २, संजय घोडावत उद्योग समूह १, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना १ असे एकूण ८ अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकष्टा करीत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. या ७ ते ८ अग्निशामक बंबांनी अनेक फेऱ्या मारून दुपारी ३ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. बॉयलर विभागाचे पत्रे जळून खाक झाले होते. आगीच्या धुराचे लोट चार ते पाच किलोमीटरपर्यंत पसरले होते. या आगीमध्ये ४० टन दगडी कोळसा आणि हजारो लिटर ऑइल जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. या आगीच्या नुकसानीबाबत तलाठी, महसूल विभागाकडे चौकशी केली असता आगीचा पंचनामा झाला नसल्याने नेमके किती नुकसान झाले आहे, याचा प्राथमिक अंदाज बांधणे कठीण असल्याचे सांगितले.
फोटो = लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील इचलकरंजी पावर लूम मेगा कलस्टर कारखान्यास भीषण आग लागली. धुराचे लोट आणि ज्वालांचे लोळ पसरल्याचे छायाचित्र.
०२ हातकणंगले आग