कोल्हापूर शहरात लसीकरणास प्रचंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:08+5:302021-04-07T04:26:08+5:30
कोल्हापूर : महापालिका कार्यक्षेत्रात मंगळवारी शहरातील २७४७ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले असून, फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिवसभरात सर्वाधिक ...
कोल्हापूर : महापालिका कार्यक्षेत्रात मंगळवारी शहरातील २७४७ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले असून, फिरंगाई प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिवसभरात सर्वाधिक ३०१ इतक्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. दरम्यान, शहरात कोरोनाचा फैलाव वाढत चालला असून, गेल्या चोवीस तासांत शहरात ११४ नवीन रुग्णांची नोंद झाली.
गुरुवारपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुदैवाने शहरात लसीकरण केलेल्या कोणाही व्यक्तीला लसीकरणानंतर त्रास झाल्याचे आढळून आले नाही.
मंगळवारी दिवसभरात आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांना कोविड लसीकरणाचा दुसरा डोस २९, फ्रंटलाइनवरी कर्मचाऱ्यास पहिला डोस १२ व दुसरा डोस ६२, ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना पहिला डोस १६८० व दुसरा १४ त्याचप्रमाणे ६० वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस ८३९ व दुसरा डोस १११ अशा एकूण २७४७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीरकरण चालू झाले आहे. पात्र नागरिकांनी जवळच्या नागरी आरोग्य केंद्र अथवा खाजगी हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन प्रशासक कादंबरी बलवकडे यांनी केले आहे.