हद्दवाढीसाठी ‘हातघाई’वर
By admin | Published: July 29, 2016 12:40 AM2016-07-29T00:40:54+5:302016-07-29T01:04:56+5:30
शहरवासीय आक्रमक : कोल्हापूर बंददरम्यान दगडफेक; धक्काबुक्कीच्या घटना; बंदी आदेश झुगारला; सर्वपक्षीय एकवटले 3
कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीसाठी पुकारलेल्या कोल्हापूर ‘बंद’साठी शिवाजी चौकातून सकाळी अकरा वाजता सर्वपक्षीय दुचाकी रॅलीची सुरुवात झाली. या रॅली मार्गावरील सुरू असलेली दुकाने पटापट बंद होत होती. त्यामुळे सहभागी कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू होता. राजारामपुरी चौकात किरण इलेक्ट्रिकल या दुकानाच्या शोरूमची काच दगडफेक करून फोडली, तर ताराबाई पार्कात राष्ट्रवादी कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या विवा कॅफेमध्ये कार्यकर्त्यांनी घुसून आतील युवक-युवतींना बाहेर काढून तेथील साहित्याची नासधूस केली, तर निवृत्ती चौकात दावणगिरी डोसा दुकानाचे साहित्य विस्कटण्यात आले. शिवाय ठिकठिकाणी धाक दाखवून दुकाने बंद केली.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या हद्दवाढप्रश्नी गुरुवारी पुकारलेल्या ‘बंद’वेळी विनापरवाना दुचाकी रॅली व जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक अशा शंभरजणांवर लक्ष्मीपुरी पोलिसांत सायंकाळी गुन्हा दाखल झाला.
हद्दवाढीच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवाजी पुतळा येथे जमले होते. यावेळी विनापरवाना दुचाकी रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर ४ आॅगस्टपर्यंत बंदी आदेश असताना एक जमाव करून मोठमोठ्याने घोषणाबाजी करून जमावबंदी आदेशाचा भंग केला. त्यानंतर याबाबतची फिर्याद पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील बाबूराव आमते यांनी दिली.
त्यानुसार महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, शहर हद्दवाढ कृती समिती निमंत्रक आर. के.पोवार, नगरसेवक मुरलीधर जाधव, शेखर कुसाळे, लाला भोसले, सत्यजित कदम, राजाराम गायकवाड, नियाज खान, अजिंक्य चव्हाण, राहुल माने, प्रतापसिंह जाधव, तौफिक मुल्लाणी, हसिना फरास, वृषाली कदम, दिलीप पोवार, ऋतुराज क्षीरसागर, दिलीप देसाई, सुरेश जरग, प्रल्हाद जाधव, नामदेव गावडे, तुषार देसाई, राजेश लाटकर, बाबा पार्टे, आदिल फरास, चंद्रशेखर कांबळे, विजय करजगार, प्रसाद जाधव, सतीशचंद्र कांबळे, महेश जाधव, संदीप देसाई, अनिल कदम, दुर्वास कदम, निरंजन कदम, गजानन भुर्के, जयवंत हारुगले, रणजित जाधव, रणजित पोवार, लाला गायकवाड या संशयितांसह व ८० ते शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोल्हापूर : राजारामपुरी माउली पुतळ््यानजीक चौकात एका बेकरीवर दगडफेक करणाऱ्या एका आंदोलकाला पकडून नेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांशी इतर कार्यकर्त्यांनी हुज्जत घालून अक्षरश: धक्काबुक्की केली. सुमारे पंधरा मिनिटे उडालेल्या या गोंधळानंतर त्या तरुणाची पोलिसांच्या तावडीतून कार्यकर्त्यांनी सुटका करून घेतली.
हद्दवाढीसाठी गुरुवारी ‘कोल्हापूर बंद’ची हाक देण्यात आली होती. त्यावेळी सर्वपक्षीयांच्यावतीने दुचाकी रॅली काढण्यात आली. संपूर्ण रॅलीच्या मार्गावर दहशत निर्माण झाल्याने दुकाने पटापट बंद होत होती. राजारामपुरीत माउली पुतळा चौकात रॅली आल्यानंतर एका कार्यकर्त्याने एक बेकरी आणि एक स्नॅक सेंटर सुरू असल्याने त्यावर दगड टाकला. त्याचवेळी रॅलीसोबत आलेल्या पोलिसांनी त्या तरुणाला घेरले. त्यावेळी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख आणि शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी त्याला पकडून पोलिस गाडीत डांबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रॅलीतील आंदोलकांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडे करून जखडून ठेवले. त्यानंतर त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यातून सोडविण्याचा प्रयत्न आर. के. पोवार, बाबा पार्टे, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, राजू लाटकर, नियाज खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी तरुणाला आपल्या ताब्यातून सोडले नसल्याने अखेर संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांनाच धक्काबुक्की करीत त्याची तावडीतून मुक्तता केली. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला.
शिवाजी चौकात एका रिक्षातील हवा सोडणाऱ्या विजय करजगार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता महापौर रामाणे आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मुक्तता केली. यावेळी पोलिस अधिकारी आणि महापौर रामाणे यांच्यात वादावादीचा प्रकार घडला.
के.एम.टी.च्या ७१२ फेऱ्या रद्द
साडेआठ लाखांचे नुकसान : ‘बंद’मध्ये कर्मचाऱ्यांचाही सहभाग
कोल्हापूर : गुरुवारी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’मध्ये महानगरपालिकेच्या के.एम.टी. उपक्रमातील कर्मचारीही सहभागी झाले होते. त्यामुळे दिवसभरातील ७१२ फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे आठ लाख ५० हजारांचे नुकसान झाले.
गुरुवारी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास शास्त्रीनगर येथील बुद्धगार्डन या बस आगारातून बसेस बाहेर काढण्यास प्रथम शिवसेना नगरसेवक नियाज खान व त्यांच्या समर्थकांनी विरोध केला. त्यामुळे पहाटेपासूनच कुठलीही बस रस्त्यावर दिवसभर धावली नाही. तर के.एम.टी. उपक्रमातील बसवाहक व चालक असे सुमारे पाचशेहून अधिक कर्मचारी हद्दवाढीच्या समर्थनात परिवहन समिती सभापती लाला भोसले व सदस्य शेखर कुसाळे, परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले होते.
के.एम.टी. उपक्रमातील १११ बसेस रस्त्यांवर धावू शकल्या नाहीत, तर शहरासह ग्रामीण भागात दररोज ७१२ फेऱ्या होतात. त्याही रद्द झाल्या.
महापालिका व के.एम.टी. कर्मचारीही रस्त्यावर
महापौरांच्या आवाहनास प्रतिसाद देत ‘काम बंद’ ठेवून महापालिकेचे आणि के.एम.टी.चे सर्व कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाले. महापालिका कर्मचारी सकाळी अंतर्गत लेखापरीक्षक अधीक्षक सुधाकर यल्लावाड, कर्मचारी कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आले. महापालिका चौकातून या कर्मचाऱ्यांनी शिवाजी चौकात जाऊन निदर्शने केली. त्यानंतर तेही दुचाकी रॅलीत सहभागी झाले. यामध्ये अजित तिवले, नेताजी शिंदे, दिनकर आवळे, रमेश पोवार, कुंदन लिमकर, विद्या दगडे, सविता तिबिले यांच्यासह सर्व विभागांतील कर्मचारी सहभागी झाली होते. के.एम.टी. कर्मचाऱ्यांनी शिवाजी चौकात निदर्शने केल्यानंतर त्यांनी शंखध्वनी केला. त्यानंतर पायी रॅली काढली. त्यांनी सहा आसनी आणि वडापमधील प्रवासी वाहतूक रोखली, तर कोंडाओळ, शारदा कॅफे व उषा चित्रमंदिरानजीक वडाप वाहतुकीवर दगडफेक केली. या पायी रॅलीमध्ये परिवहन समिती सभापती लाला भोसले, परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, राजू तिवले, इर्शाद नायकवडी, प्रमोद पाटील, विनायक मेंगाणे, निमाज मुल्लाणी सहभागी झाले.
दहांहून अधिक रिक्षा फोडल्या; नोंद मात्र दोनच
कोल्हापूर : कोल्हापूर ‘बंद’वेळी गुरुवारी शहरात विविध ठिकाणी दहांहून अधिक रिक्षा फोडण्यात आल्या. यामध्ये बागल चौक, राजाराम रोड, आदी ठिकाणी रिक्षा फोडल्या आहेत; पण, पोलिस दप्तरी दोनच रिक्षा फोडल्याची नोंद आहे.
बिंदू चौकाकडून रॅलीद्वारे कार्यकर्ते कॉमर्स कॉलेजकडे जात असताना तेथील प्रवाशांनी भरलेली वडापची रिक्षा फोडली. त्यानंतर कार्यकर्ते उमा टॉकीजमार्गे राजाराम रोड (एम. जे. मार्केटजवळ) येथे आले असता त्याठिकाणीही रिक्षा फोडली. लगेचच पुढे बागल चौकात प्रवासी घेऊन जाणारी रिक्षाही फोडली.
दरम्यान, कॉमर्स कॉलेजजवळ दोन रिक्षांची काच फोडल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात संशयित शाम काकासो जाधव (वय ३८, रा. विचारेमाळ, कोल्हापूर) व गजानन रघुनाथ भुर्के (५३, रा. मंगळवार पेठ) या दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. फिर्याद रोशन दत्तात्रय माने (३०, रा. जोशी गल्ली, विक्रमनगर) यांनी दिली.