निवडणुकीपूर्वी हद्दवाढीचा प्रयत्न

By admin | Published: March 1, 2015 12:35 AM2015-03-01T00:35:47+5:302015-03-01T00:36:16+5:30

पी. शिवशंकर : ‘लोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेस-२०१५’ चे शानदार उद्घाटन

Huge trick before elections | निवडणुकीपूर्वी हद्दवाढीचा प्रयत्न

निवडणुकीपूर्वी हद्दवाढीचा प्रयत्न

Next

कोल्हापूर : शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेची आहे; त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी हद्दवाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती व जनतेच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी येथे केले.
‘लोकमत’ समूहातर्फे ‘लोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेस - २०१५’ या दोनदिवसीय गृहप्रदर्शनाचे आयोजन हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये करण्यात आले आहे.
सकाळी साडेदहा वाजता महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी ‘क्रिडाई’ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजीव परीख, ‘क्रिडाई,’ कोल्हापूरचे अध्यक्ष गिरीश रायबागे, सेक्रेटरी हेमांग शहा, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर पी. शिवशंकर यांच्यासह मान्यवरांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या गृहप्रकल्पांच्या स्टॉलना भेटी दिल्या. सर्वसामान्यांपासून उच्चभ्रू लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी ‘लोकमत’ने चांगली भूमिका पार पाडल्याचे सांगून शिवशंकर यांनी कौतुक केले.
पी. शिवशंकर म्हणाले, कोल्हापूर हे राज्यातील मोठे शहर आहे. त्यामुळे त्याच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ महत्त्वाची आहे. त्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येणाऱ्या निवडणुकीपूर्वीच हद्दवाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी राजकीय इच्छाशक्तीची व हद्दवाढीत असलेल्या गावांतील नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.
शहरातील खुल्या जागांबाबत काही बांधकाम व्यावसायिकांनी संपर्क साधून या जागा विकसित करून, त्या परिसरातील महापालिकेच्या हद्दीतील रस्ते करून त्यांची पाच वर्षे देखभाल करण्याची तयारी दर्शविली आहे. शहरातील रस्ते, ड्रेनेज यासह अनेक मोठ्या कामांचे लक्ष्य समोर असून, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
गिरीश रायबागे म्हणाले, बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीने कोल्हापुरात गुंतवणुकीसाठी चांगली संधी दिसत आहे. येथील रियल इस्टेटमधील मार्केट अवास्तव नसून ते योग्य आहे. लोकांची बदलती जीवनशैली पाहून गृहप्रकल्प सध्या इथे येत आहेत. त्यामुळे नक्कीच कोल्हापूर मॅन्युफॅक्चरिंंग हब होईल.
संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविकात, बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यातील दुवा साधण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे, ते या प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्कीच यशस्वी होईल. बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीसाठी राज्यात कोल्हापूरचे आकर्षण निर्माण झाले आहे. सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी आभार मानले. यावेळी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, आदींसह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

Web Title: Huge trick before elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.