ह द्द वा ढी चे घमासान; प्रस्तावासंबंधी शासन सकारात्मक
By Admin | Published: June 28, 2015 12:50 AM2015-06-28T00:50:07+5:302015-06-28T00:53:07+5:30
पालकमंत्री : विरोधही झुगारणार नाही
कोल्हापूर : महानगरपालिकेकडून एक किलोमीटर हद्दवाढीच्या नव्याने आलेल्या प्रस्तावासंबंधी शासन सकारात्मक आहे. मात्र, हद्दवाढ ग्रामीण लोकमानसाला विश्वासात घेऊन करणार आहोत. विरोध झुगारून हद्दवाढ करण्यात येणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात हद्दवाढ समर्थनार्थ आणि विरोधी या दोन्ही मंडळींकडून बाजू ऐकून घेतल्यानंतर मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील अन्य शहरांची हद्दवाढ झालीे. पुणे शहराची सात वेळा हद्दवाढ झाली; विरोध करणाऱ्यांनीही हद्दवाढीसाठी सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे. विरोध आणि समर्थन यांतील मधला मार्ग काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विरोध लक्षात घेऊनच हद्दवाढीचा निर्णय सबुरीने घेत आहे.
राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, अॅड. महादेव आडगुळे, माजी महापौर नंदकुमार वळंजू, ‘स्थायी’ सभापती आदिल फरास, राजू लाटकर, भाजपचे शहराध्यक्ष महेश जाधव, अनिल घाटगे, प्रल्हाद चव्हाण, पंडितराव सडोलीकर, दिलीप पोवार यांनीही हद्दवाढ आवश्यक असल्याचे सांगितले. उपमहापौर मोहन गोंजारे, सुनील पाटील, चंद्रकांत घाटगे, मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख, आदी उपस्थित होते.
दादांना बॅग भरण्याचीच घाई...
मंत्री चंद्रकांतदादा पाटील बैठकीत ‘मला मुंंबईला जायचे आहे, बॅग भरायची आहे,’ असे सांगत गडबड करीत होते. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, सुजित मिणचेकर यांना भेटण्याचेही टाळून जात होते. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यामुळे त्यांनी भेट घेतली. भेट टाळण्याच्या प्रयत्नामुळे विरोधकांची बाजू ऐकण्याची दादांची मानसिकता नव्हती की काय, अशी चर्चा झाली.