हुक्केरी मतदारसंघामध्ये प्रतिष्ठेची दुरंगी लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:45 PM2018-04-26T23:45:40+5:302018-04-26T23:45:40+5:30
विलास घोरपडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
संकेश्वर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून हुक्केरी मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. यावेळी भाजपचे उमेश कत्ती विरुद्ध काँगे्रस (आय)चे ए. बी. पाटील यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार असे चित्र आहे.
एकेकाळी हुक्केरी तालुक्यात काँगे्रसचे वर्चस्व होते. काँगे्रसचा हा अश्वमेध जनता परिवाराच्या ए. बी. पाटील यांनी १९८९ मध्ये संकेश्वर क्षेत्रात, तर कै. विश्वनाथ कत्ती यांनी १९८५ मध्ये हुक्केरी क्षेत्रात रोखला आहे. तद्नंतर आतापर्यंत गटबाजीच्या राजकारणातून पक्षाऐवजी व्यक्तीनिष्ठ राजकारणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
१९५२ ते १९८५ दरम्यान हुक्केरी तालुक्यात संकेश्वर व हुक्केरी मतदारसंघात १३ वेळा झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. १९५७ मध्ये एकमेव महिला चंपाबाई भोगले (काँगे्रस) निवडून गेल्या असून, १९८५ ते २०१३ या काळात जनता व भाजप निवडून आले आहेत. तालुक्याचा राजकीय इतिहास पाहता अप्पणगौडा पाटील (१९७३), बाळासाहेब सारवाडी (१९७५), उमेश कत्ती (१९८५ व २००८) अशी तालुक्यात चौथी पोटनिवडणूक झाली होती.
१९६२ मध्ये एम. पी. पाटील काँगे्रसतर्फे निवडून येऊन तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई मंत्रिमंडळात ते कृषिमंत्री बनले होते.
तालुक्यात हुक्केरी व संकेश्वर असे दोन मतदारसंघ होते. मात्र, २००८ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत संकेश्वर गोठवून हुक्केरी क्षेत्रात संकेश्वर शहरासह ६७ गावांचा असा मतदारसंघ उदयास आला. संकेश्वर परिसरातील उर्वरित गावे यमकनमर्डी मतदारसंघात घातल्याने २००८ मध्ये काँगे्रसच्या ए. बी. पाटलांना पराभवाला सामोरे जावे लागले. तद्नंतर निधर्मी जनता दलातून आमदार उमेश कत्तींनी पक्षाच्या टोपीत बदल करून भाजपात सामील झाल्याने २००९ व २०१३ या दोन निवडणुकीत एकतर्फी विजय मिळविला होता.
कोणाला निवडायचे, कोणाला पाडायचे
तालुक्यातील सहकारी संस्था व संघावर कत्ती गटाचे वर्चस्व असले तरी काँगे्रसने ए. बी. पाटील यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत कोणाला निवडून आणावयाचे ऐवजी कोणाला पाडायचे याची दबक्या आवाजात चर्चा आहे. परिणामी कत्तींच्या प्रतिष्ठेची व ए. बीं.च्या अस्तित्वाची लढत सुरू झाली आहे.
भागात प्रथमच शिवसेनेतर्फे सुभाष कासारकर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. तालुक्यात सातवेळा आमदार बनलेल्या उमेश कत्तींची राजकीय वाटचाल पाहता हुक्केरी क्षेत्रातून वडील विश्वनाथ हत्ती (१९८५) हे विधानसभेवर निवडून गेले.
मात्र, अधिवेशन काळात त्यांचे बंगलोरात निधन झाले. त्या रिक्त जागी १९८५ मध्ये पोटनिवडणुकीत उमेश कत्ती प्रथम निवडून आले. त्यानंतर २००४ मध्ये उमेश कत्तींनी काँगे्रसतर्फे निवडणूक लढवून भाजपच्या शशिकांत नाईक यांच्याकडून केवळ ८०० मतांनी पराभव पत्करला होता.