हुक्केरीत दोन माजी मंत्र्यांमध्ये लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 11:51 PM2018-05-08T23:51:56+5:302018-05-08T23:51:56+5:30
हुक्केरी: बेळगाव जिल्ह्णातील हुक्केरी मतदारसंघामध्ये उमेश कत्ती (भाजप) आणि आप्पगौडय्या पाटील (राष्ट्रीय काँग्रेस) या दोन माजी कॅबिनेट मंत्र्यांमधील लढत लक्षवेधी ठरली आहे.
समीर देशपांडे ।
हुक्केरी: बेळगाव जिल्ह्णातील हुक्केरी मतदारसंघामध्ये उमेश कत्ती (भाजप) आणि आप्पगौडय्या पाटील (राष्ट्रीय काँग्रेस) या दोन माजी कॅबिनेट मंत्र्यांमधील लढत लक्षवेधी ठरली आहे. ‘पक्षापेक्षा व्यक्ती मोठी’ या सूत्रानुसार इथली निवडणूक होत आहे.
कत्ती हे नवव्यांदा या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत असून आठपैकी सात निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. पूर्वी काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास असलेले कत्ती हे येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषीमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा कर्नाटकचे स्वतंत्र कृषी अंदाजपत्रक मांडले होते. स्वत:चा खासगी साखर कारखाना आणि संकेश्वर येथील ‘हिरा शुगर’वर सत्ता ही त्यांची जमेची बाजू आहे.
शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेले आप्पगौडया पाटील हे काँग्रेसचे या परिसरातील ज्येष्ठ नेते असून त्यांचे वडील बसगोंडा पाटील यांचा ‘हिरा शुगर’च्या स्थापनेमध्ये मोलाचा वाटा होता. पटेल यांच्या मंत्रिमंडळामध्ये कत्ती आणि पाटील हे दोघेही कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत होते. जनता दलाच्यावतीने निवृत्त वरिष्ठ अभियंता मल्लिकार्जुन पाटील हे निवडणूक लढवत असून ‘हिरा शुगर’चे संस्थापक आप्पनगौडा पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. याशिवाय राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही येथे उमेदवार उभे केले आहेत.
वीज संघाचा सत्तेसाठी वापर
कर्नाटकातील ‘पायलट प्रकल्प’ म्हणून स्थापन करण्यात आलेला ‘हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघ’ हा उमेश कत्ती यांच्या ताब्यात आहे. शासनाकडून वीज खरेदी करून ती नागरिक, शेतकऱ्यांना पुरविण्याची हुक्केरी तालुक्यातील संपूर्ण जबाबदारी या संघाकडे आहे. या सत्तेचा प्रभावी वापर कत्ती यांच्याकडून केला जातो.