मानवी हस्तक्षेपाने नद्याही बनल्या मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:34 AM2018-10-02T00:34:27+5:302018-10-02T00:34:31+5:30
कोल्हापूर : केवळ मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे माणसाला तारणाऱ्या नद्या मारक बनल्या आहेत, असे भीषण वास्तव प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी मांडले. नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी संध्याकाळी डॉ. अवचट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या स्वभावाला साजेशा अशा पद्धतीने, स्वत: तयार केलेल्या छोट्या कागदी होड्या पाण्यात सोडून आणि बासरी वादन करून त्यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. तीन दिवस या महोत्सवामध्ये पर्यावरणाशी संबंधित आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, स्थानिक लघुपट, चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
डॉ. अवचट म्हणाले, विकासाच्या नावाखाली सगळी फसवाफसवी चालली आहे. नद्यांचे प्रवाह कुंठित केल्याने काय होते हे केरळमध्ये दिसले आहे. साखर कारखान्यांचे सांडपाणी, इचलकरंजीच्या प्रोसेसर्सचे रसायनमिश्रित पाणी यामुळे पंचगंगा प्रदूषित झाली. अतिपाणी वापरामुळे या जिल्ह्यात मीठ फुटण्याचे प्रमाण वाढले, त्यामुळे उसाचा उतारा कमी आला. वाळूवरून नदी वाहताना शेजारच्या जमिनीची माती सोबत नेत नव्हती. मात्र, आता वाळू उपसा वाढला आणि शेजारची मातीही पाण्याबरोबर वाहून जाऊ लागली. केवळ शहरांमध्ये सुविधा दिल्या गेल्याने तेथे गर्दी वाढली, गर्दीची तहानभूक भागवण्यासाठी मग संहाराची भूमिका घेतली गेली. झाडे तुटली, प्रवाह बदलले. याचे गंभीर परिणाम आता भोगावे लागणार आहेत.
असोसिएटेड व्हाईस प्रेसिडेंट (एच. आर.) कृष्णा गावडे म्हणाले, किर्लोस्करने गेली ६ वर्षे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील १३ हजार नागरिकांची एड्सविषयक तपासणी केली. १२ शाळांमध्ये ७० ‘वॉश व्हालिंटिअर्स’ नेमण्यात आले आहेत. पंचगंगेला मिळणाºया एका नाल्यातील पाण्याचे शुद्धिकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. महोत्सव समन्वयक विरेन चित्राव म्हणाले, महोत्सवानंतर सर्वाधिक पर्यावरणविषयक उपक्रम हे कोल्हापुरात आयोजित केले जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये नेमलेले ‘इको रेंजर’ वर्षभर काम करणार आहेत. आता यापुढे त्रिपुरा, मणिपूरमध्येही महोत्सव घेतला जाणार आहे.
बिझनेस हेड संजीव निमकर म्हणाले, शाश्वत विकासाचे
महत्त्व जनतेला पटवून देत
असतानाच त्याच्याशी पूरक कार्यशैली निर्माण करण्याचे काम
किर्लोस्कर करत असून व्यवसाय करतानाही समाजभान ठेवण्याचे काम या वसुंधरा महोत्सवाच्या माध्यमातून केले जात आहे.
पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड आणि ॠतू काशीद यांनी सूत्रसंचालन केले, तर अॅड. केदार मुनिश्वर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्लान्ट हेड चंद्रशेखर रानडे, एच. आर. मॅनेजर राहुल पवार, उज्ज्वल नागेशकर, तुषार साळगावकर, डॉ. सुनील पाटील, प्रियदर्शिनी मोरे, विजय टिपुगडे, भाऊ सूर्यवंशी उपस्थित होते.