‘कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक’ची शताब्दी स्त्रियांबद्दल मानवतावादी विचार : राजर्षी शाहूंचा द्रष्टेपण जगाच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:33 AM2018-08-01T00:33:51+5:302018-08-01T00:35:15+5:30
राजर्षी शाहू महाराजांनी तत्कालीन कोल्हापूर संस्थानात केलेल्या स्त्रियांना क्रूरपणाने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याचे शताब्दी वर्ष उद्या, गुरुवार (दि. २ आॅगस्ट) पासून सुरू होत आहे. शाहूंनी २ आॅगस्ट १९१९ रोजी हा कायदा केला आहे. त्यातून त्यांचा
विश्वास पाटील ।
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी तत्कालीन कोल्हापूर संस्थानात केलेल्या स्त्रियांना क्रूरपणाने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याचे शताब्दी वर्ष उद्या, गुरुवार (दि. २ आॅगस्ट) पासून सुरू होत आहे. शाहूंनी २ आॅगस्ट १९१९ रोजी हा कायदा केला आहे. त्यातून त्यांचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन किती विशाल व मानवतावादी होता, हेच दिसून येते. शाहूंनी एकूण ११ कलमांच्या या कायद्यान्वये स्त्रीला कू्ररपणाची वागणूक देणाºया अपराध्यास सहा महिन्यांचा कारावास व २०० रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा ठोठावण्याची तरतूद केली होती.
शिवाजी विद्यापीठातील शारदाबाई पवार अध्यासनातर्फे त्यानिमित्त उद्या, गुरुवारीच विद्यापीठात एक दिवसाची कार्यशाळा होत आहे. स्त्रियांवरील अत्याचारापासून ते कौटुंबिक हिंसाचारापर्यंत आज समाजमन सजग झाले असले तरी शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांच्या हक्कांबाबत, त्यांना दिल्या जाणाºया वागणुकीबाबत शाहू महाराज किती संवेदनशीलतेने विचार करीत होते व नुसता विचारच न करता त्या विचाराला कायदेशीर रूप देऊन समाजाला वळण लावण्याचा प्रयत्न करीत होते, याचेच प्रत्यंंतर या कायद्यातून येते.
अनेक कुटुंबांत नवरा व त्याचे नातलग यांच्याकडून नानाप्रकारे स्त्रियांचा छळ होत असे. उच्चभ्रू समाजातील स्त्रियांना तर त्याबद्दल ‘ब्र’ही काढता येत नसे. त्याची दखल घेऊनच महाराजांनी हा कायदा केला. स्वतंत्र भारतात हाच कायदा २००५ ला झाला.
शाहू या कायद्याबद्दल म्हणतात की,‘हिंदुस्थानात हिंसा प्रतिबंधक कायद्याची शताब्दी लोकांचे जे निरनिराळे समाज आहेत. त्यांच्या शास्त्रकारांनी हिंदू कुटुंबाचे पुढाºयांना स्त्रियांना शासन करण्याची परवानगी दिली आहे; परंतु त्या परवानगीचा दुरुपयोग होऊन स्त्रियांना वाटेल तशा वाईट रीतीने वागविण्याचा आपणाला सनातन काळापासून परवानाच मिळाला आहे, अशी पुरुषांची समजूत झालेली दिसते.
स्त्रियांना होणाºया जाचांचे जे प्रकार इंडियन पिनल कोडच्या मर्यादेत येऊ शकत नाहीत अशा प्रकारच्या जाचापासून होणाºया दुष्परिणामास आळा घालावा म्हणून हे नियम करणे आवश्यक वाटते.’
शाहूंची दूरदृष्टी : कौटुंबिक हिंसाचाराबद्दल शाहूंनी केलेल्या कायद्यानंतर ८६ वर्षांनी भारताने हा कायदा केला. शाहूंच्या पुढाकाराने १९१३ मध्ये कोल्हापुरात ‘दि कोल्हापूर अर्बन को-आॅप सोसायटी’ (सध्याची कोल्हापूर अर्बन बँक) स्थापन केली व त्यानंतर शंभर वर्षांनंतर २०१३ ला ‘युनो’ने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जाहीर केले. शाहू महाराज काळाच्या किती पुढे होते, हे स्पष्ट होते.
स्त्रियांवरील हिंसाचार रोखणारा कायदा करणारे शाहू महाराज हे स्वतंत्र भारतातीलच नव्हे तर जगातील पहिले राजे असू शकतील. भारतात सन २००५ ला कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा झाला. यातून शाहूंचे द्रष्टेपण अधोरेखित होते. - डॉ. भारती पाटील,
राज्यशास्त्राच्या अभ्यासक