कोल्हापूरच्या माणुसकीमुळे पूर संकटाची तीव्रता कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:53 AM2019-08-22T00:53:31+5:302019-08-22T00:53:35+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या माणुसकीमुळे शहर आणि जिल्ह्यातील पुराच्या संकटाची तीव्रता कमी झाल्याच्या भावना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन ...
कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या माणुसकीमुळे शहर आणि जिल्ह्यातील पुराच्या संकटाची तीव्रता कमी झाल्याच्या भावना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केल्या. या काळात जिल्हा परिषदेच्या यंत्रणेनेही चांगली कामगिरी केल्याचे ते म्हणाले.
पूरसंकट संपल्यानंतर सध्या जिल्हाभर स्वच्छता आणि आरोग्यसेवा देण्यावर लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर मित्तल यांची भेट घेतली असता ते बोलत होते. ते म्हणाले, शहरासह जिल्ह्यातील सुमारे पावणेचारशे गावे बाधित झाली. या संकटाच्या काळात सगळ्यांमध्ये शहर आणि जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्ते यांनी जे काम केले आहे, त्याला तोड नाही; कारण एकीकडे प्रशासनाची यंत्रणा नागरिकांची सुटका करण्याकडे पूर्ण लक्ष देत असताना दुसरीकडे याच संस्था आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या राहण्याची, जेवणाची, नाश्ता, चहाची सर्व सोय केली; म्हणूनच आम्ही ‘रेस्क्यू’वर पूर्ण लक्ष देऊ शकलो.
आम्ही सुरुवातीपासूनच महापुराबाबत गावागावांत आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देत होतोच; परंतु कमी कालावधीत पडलेल्या प्रचंड पावसामुळे सगळ्यांचेच अंदाज फोल ठरले. अशातच जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आल्याने तेथील सर्व यंत्रणा जिल्हा परिषदेतून कार्यरत झाली. सुदैवाने आमच्याकडील बहुतांश अधिकारी आणि आवश्यक विभागांचे कर्मचारी रोज कामावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाला आम्ही मोठी मदत करू शकलो. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद एकत्र आल्याने अनेक निर्णय गतीने घेता आले.
महापूर ओसरल्यानंतर आता गावोगावी आम्ही स्वच्छतेचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेतले आहे. साडेचारशेहून अधिक पाणीयोजना सुरू करण्यात आल्या. गावागावांत फॉगिंग सुरू आहे. आणखी आठवडाभर हे काम सातत्याने करावे लागणार आहे. एकीकडे प्रचंड पूर आला असताना दुसरीकडे ग्रामीण भागात ३५ हून अधिक टॅँकर ग्रामस्थांना पाणीपुरवठा करीत होते.
जि. प. पदाधिकारी, सदस्यांचे मोठे सहकार्य
एकीकडे जि. प. अधिकारी, कर्मचारी कार्यरत असताना दुसरीकडे पदाधिकारी आणि सदस्यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे मित्तल यांनी सांगितले. ज्या ज्या ठिकाणी काही छोट्या-मोठ्या अडचणी आल्या, त्या त्या ठिकाणी आम्ही तेथील पदाधिकारी आणि सदस्यांशी संपर्क साधल्यानंतर त्या अडचणी तातडीने दूर करण्याची भूमिका या सर्वांनी घेतली; त्यामुळे आम्ही प्रभावीपणे काम करू शकलो.