हुंबरवाडीतील रेश्माच्या मदतीसाठी हात सरसावले
By Admin | Published: March 22, 2017 11:39 PM2017-03-22T23:39:30+5:302017-03-22T23:39:30+5:30
‘लोकमत’ने दिली हाक : जगण्यासाठीची धडपड सुरूच; तरुणांनी गावात काढली मदतफेरी
बिळाशी : एकीकडे पैशाच्या लालसेने दुसऱ्याला ओरबाडण्याच्या घटना समाजात घडत असताना, दुसऱ्याच्या दु:खाने गलबलून जाऊन रक्ताच्या नात्यापलीकडेही माणुसकीचा गहिवर असणारे काही लोक समाजात आहेत. एमपीएससी करणारी रेश्मा शिंदे तीन महिने कोमात असून, जगण्यासाठी तिची धडपड सुरू असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिध्द होताच मदतीचे हात सरसावले. इस्लामपूरचे उद्योजक सर्जेराव यादव यांनी तिला आर्थिक मदत केली.बिळाशी (ता. शिराळा) येथील दुरंदेवाडीजवळ हुंबरवाडीची रेश्मा संजय शिंदे (वय २०) ही तरुणी अत्यंत हुशार. दहावी, बारावीला शाळेत पहिली. विद्यापीठातही उत्तम गुण मिळवून राज्य सेवा परीक्षेचा अभ्यास करणारी रेश्मा निव्वळ अभ्यासाच्या ध्यासामुळे आजारी पडली. ताप अंगात मुरला आणि ती कोमात गेली. फाटक्या परिस्थितीच्या आई-वडिलांजवळचे पैसे संपले. पण जिद्द संपली नाही. लेकीला बरे करायचे, या जिद्दीने वडील पायाला भिंगरी बांधून साऱ्यांचे हुंबरे झिजवत आहेत. ‘लोकमत’मधून याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच सर्जेराव यादव यांनी हॉस्पिटलमध्ये रेश्माची भेट घेतली. तिला पाहून त्यांचे हृदय पाझरले आणि त्यांनी २० हजारांची मदत दिली. बिळाशीच्या बंडा कोळेकर, दत्ता सुपेकर, दत्ता शिराळकर, वैभव सातपुते, विजय रोकडे, विश्वास पाटील, बाबासाहेब परीट, विष्णू पाटील, आनंदराव पाटील, पोपट कदम यांच्यासह अनेक तरुणांनी गावातून फेरी काढून एका दिवसात ४० हजार रुपये जमा करून वडिलांकडे दिले.
सांगलीहून झिनत मुजावर यांनीही मदत दिली. शिरशीहून अमर पाटील, ‘अंनिस’चे डॉ. सुनील पाटील यांनीही मदत केली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वत: प्रयत्न केले, तर इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही मोठी मदत केली.
(वार्ताहर)