हुंदक्यांनी ‘मोतीबाग’ही गदगदली..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:34 AM2018-09-18T00:34:24+5:302018-09-18T00:34:29+5:30

Hundanki 'Moti Bagh' too thrilled! | हुंदक्यांनी ‘मोतीबाग’ही गदगदली..!

हुंदक्यांनी ‘मोतीबाग’ही गदगदली..!

Next

कोल्हापूर : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या पार्थिवाचे सोमवारी दुपारी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या हजारो कुस्तीरसिक, मल्ल तसेच मान्यवरांनी अंतिम दर्शन घेतले. भवानी मंडपातील न्यू मोतीबाग तालमीच्या प्रांगणात लाडक्या वस्तादांचे अखेरचे दर्शन घेताना त्यांच्या पठ्ठ्यांनी ‘आबा’, ‘मामा’ म्हणून टाहो फोडला. एरव्ही शड्डूचा आवाज घुमणारी मोतीबाग सोमवारी मात्र पैलवानांच्या हुंदक्यांनी गदगदून गेली.
हिंदकेसरी आंदळकर यांचे रविवारी (दि. १६) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरातील त्यांच्या राहत्या घरी शंभरठाणा (न्यू छत्रपती पार्क) येथे आणण्यात आले. पार्थिवासोबत पत्नी सुमित्रा, चिरंजीव अभिजित, सून ममता, नातू आदेश, नात ऐश्वर्या, भाऊ रघुनाथ व मारुती हेही पुण्याहून रुग्णवाहिकेतून आले. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी नातेवाइकांसह मान्यवरांनी दर्शन घेतले.
आंदळकर यांची कर्मभूमी असलेल्या भवानी मंडपातील न्यू मोतीबाग तालमीमध्ये त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव आखाड्यात नेण्यात आले. तेथील लालमाती त्यांच्या कपाळावर लावण्यात आली. त्यानंतर पार्थिव दर्शनासाठी तालमीबाहेर ठेवण्यात आले. तासाभरानंतर भवानी मंडपापासून दसरा चौकापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यानंतर त्यांच्या मूळगावी पुनवत (ता. शिराळा, जि. सांगली) येथे अंतिम संस्कारासाठी पार्थिव नेण्यात आले.
महान भारत केसरी दादू चौगुले, अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक काका पवार, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी नामदेवराव मोळे, रावसाहेब (चाचा) तनपुरे, संभाजी पाटील (आसगावकर), नामदेव मोळे, विष्णू जोशीलकर, शिवाजीराव पाचपुते, अप्पा कदम, बापू लोखंडे, आप्पा खरजगे, चंद्रहार पाटील, गुलाब बडे, चंद्रकांत पाटील, बालू पाटील, बाला रफीक, राजू कोळी, अशोक नांगराळे, आंध्र केसरी दुर्गासिंह लडू आणि शंकर पैलवान, कर्नाटक केसरी अप्पा बेळगावकर, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद, आदी प्रमुख मल्लांसह शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, महापौर शोभा बोंद्रे, उर्वरित महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, माजी आमदार पी. एन. पाटील, जिल्हा प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे प्रातांधिकारी सचिन इथापे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक
डॉ. अभिनव देशमुख, राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, सुनील निम्हण, शाहूपुरी तालमीचे वस्ताद रसुल हनिफ, सुभाष लोंढे,
सोनू जगदाळे, बंडू गाडे (अहमदनगर), क्रीडा संघटक श्रीपाल जर्दे , पी. जी. पाटील, प्रशिक्षक उत्तम पाटील, चंद्रकांत चव्हाण, माजी महापौर महादेवराव आडगुळे, आर. के. पोवार, भिकशेठ पाटील, कर्णसिंह गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव कळंत्रे, अनिल माने, आनंदराव पवार, महसूल विभागातील अधिकारी राजेंद्र बोरकर, निवृत्त पोलीस उपअधीक्षक दिलीप पाटील, के. एस. ए. पदाधिकारी माणिक मंडलिक, संभाजी मांगोरे पाटील, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.
अश्रूंचा बांध फुटला
हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांना त्यांच्या पत्नी सुमित्रा यांनी नेहमीच साथ दिली. ३ जून १९६१ रोजी त्यांचा विवाह झाला होता, तेव्हापासून त्या प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत होत्या. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यासोबतच त्या रुग्णालयातही होत्या. त्यानंतर त्यांचे पार्थिव सकाळी पुण्याहून आणतानाही त्यांच्यासोबतच रुग्णवाहिकेत त्या मुलगा अभिजित, सून ममता, नात व नातूसह होत्या. विशेष म्हणजे २0 तासांहून अधिक काळ त्यांनी परिस्थितीला तोंड देत आपल्या भावनांना आवर घातला. सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास न्यू पॅलेस परिसरातील शंभरठाण येथील निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी पती गणपतराव यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यानंतर मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे मन हेलावून गेला.
मोतीबागेत शड्डूचा आवाज स्तब्ध
हिंदकेसरी आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली १५० हून अधिक छोटे-मोठे मल्ल मोतीबाग तालमीमध्ये कुस्तीचे धडे गिरवत आहेत. रविवारी (दि. १६) निधनाची वार्ता मोतीबागेत थडकल्यानंतर या सर्व मल्लांनी सराव बंद करून केवळ वस्तादांच्या पार्थिव देहाचीच वाट पाहिली. त्यामुळे कालपासून शड्डूचे आवाज आणि सराव पूर्णपणे थांबला होता; त्यामुळे मोतीबाग तालमीमध्ये एकप्रकारे सन्नाटा पसरला होता.
तुम्हीच आमचा श्वास..!
आंदळकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तालमीच्या दारात लावण्यात आलेल्या फलकावरील ‘जिथे श्वासात श्वास गुंततात, तेच क्षण आपले असतात, तुम्ही नसलात आता तरी, तेच क्षण आजही आम्हास आठवतात’ ही काव्यपंक्ती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.
डोळे दीपवून टाकणारी कामगिरी
एखाद्या खेळाडूचे ऐश्वर्य म्हणजे त्याला मिळालेली पदके आणि सन्मान. आपल्या कुस्तीतील कारकिर्दीमध्ये गणपतराव आंदळकरांनी विविध पातळीवरील पदकांची कमाई केली. त्याच्या जोरावर त्यांना मानाचा शाहू पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले, तर अनेक गदाही त्यांनी या काळात मिळविल्या होत्या. त्यांच्या घराच्या हॉलमध्ये अशा अनेक पदकांनी आणि सन्मानांची कपाटे सजली आहेत. त्यांचे हे ऐश्वर्य अनेकांचे डोळे दीपविणारे असेच होते.

Web Title: Hundanki 'Moti Bagh' too thrilled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.