शंभर किलोंचा बोकड, पक्षी आकर्षण
By admin | Published: January 29, 2017 12:28 AM2017-01-29T00:28:00+5:302017-01-29T00:28:00+5:30
भिमा कृषी प्रदर्शन : जिल्ह्यातून शेतकरी, नागरिकांची मोठी गर्दी
कोल्हापूर : भिमा उद्योग समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘भिमा कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आबाल-वृद्धांनी एकच गर्दी केली होती. शंभर किलोंचा आफ्रिकन बोर जातीचा बोकड, तर रामचंद्र गायकवाड यांचा सहा फूट उंचीचा पांढराशुभ्र ‘बादल घोडा’, साडेतीन वर्षांचा ‘राजा’ खोंड व विविध रंगाचे पक्षी प्रदर्शनातील आकर्षण आहे.
कृषी प्रदर्शनाचा शनिवारी दुसरा दिवस होता. चौथ्या शनिवारची सुटी असल्याने सकाळपासूनच प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी झाली. दुपारी तीननंतर एकदमच गर्दी उसळली. शेती औजारांचे विविध स्टॉलवर शेतकरी सविस्तर माहिती घेत थांबल्याने तिथे गर्दी कायम राहिली. आधुनिक तंत्रज्ञानयुक्त ट्रॅक्टर, रोटावेटर, खोडवा तपासणी यंत्र, स्प्रे पंपच्या व्हरायटी पहावयास मिळतात.
विविध जातीची जनावरेही आकर्षण ठरत आहेत. सात फूट लांब शिंगे असणारी पंढरपुरी म्हैस, देशी गायी, खिलार पाडी, लातूर येथील केरबा शिंदे यांचा साडेतीन वर्षांचा ‘राजा’ खोंड, सिल्व्हर शाईन (पंजाबी) घोडे, काटेवाडीचा ब्लॅकजॅक घोडा यांनी शनिवारी गर्दी खेचली. साऊद शेख यांचा तीन वर्षांचा आफ्रिकन जातीचा शंभर किलोंचा बोकड पाहण्यासाठी अक्षरश: उड्या पडल्या होत्या. स्ट्रॉबेरी, हळद, आजरा घनसाळच्या स्टॉलनेही गर्दी खेचली. ‘आधुनिक फुलशेती व भाजीपाला लागवडीचे तंत्र’ या विषयावर प्रा. विजयकुमार कानडे, ‘सरकारच्या विविध योजना’ यावर जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी मार्गदर्शन केले.
आजचे मार्गदर्शन :
ठिबक सिंचन व ऊस -
पांडुरंग आव्हाड.
नैसर्गिक व सेंद्रिय शेती - जयदेव बर्वे.
ऊस शेतीसाठी ठिबक आधुनिक तंत्रज्ञान - प्रा. डॉ. अरुण देशमुख.
प्रदर्शनातील आकर्षण
शंभर किलो वजनाचा आफ्रिकन बोकड, सात फूट लांब शिंगाची म्हैस, नांदेडचा ‘लाल कंदारी’ वळू, टर्की कोंबड्या, आठ लाख किमतीची खिलार, कडकनाथ कोंबड्या.
खाद्यांच्या स्टॉलवर उड्या!
यंदा बचत गटांच्या खाद्यांच्या स्टॉलची संख्या अधिक आहे.
चमचमीत खाद्यपदार्थांसह आइस्क्रिमच्या विविध व्हरायटीच्या स्टॉलवर शनिवारी दिवसभर गर्दी दिसत होती.
जातिवंत जनावरांचे रिंगण
प्रदर्शनात सहभागी झालेल्या जातिवंत जनावरांचे रोज सायंकाळी आठ वाजता रिंगण असते.
यामध्ये हलगीच्या आवाजावर ठेका धरणाऱ्या जनावरांचे क्रमांक काढले जातात, त्यांचा गौरव प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी करण्यात येतो.