कोल्हापूर विभागातील २७ कारखान्यांकडून शंभर टक्के एफआरपी, २२३२ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले

By राजाराम लोंढे | Published: January 10, 2023 05:44 PM2023-01-10T17:44:44+5:302023-01-10T17:45:24+5:30

एक रकमी एफआरपी पहिली उचलीची घोषणा केल्याने ऊस दराचे आंदोलनही फार ताणले गेले नाही

Hundred percent FRP from 27 factories in Kolhapur division, 2232 crores were given to the farmers | कोल्हापूर विभागातील २७ कारखान्यांकडून शंभर टक्के एफआरपी, २२३२ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले

कोल्हापूर विभागातील २७ कारखान्यांकडून शंभर टक्के एफआरपी, २२३२ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील ३४ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. त्यापैकी तब्बल २७ कारखान्यांनी १५ डिसेंबर २०२२ अखेर गाळप केलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना सगळे २२३२ कोटी ७१ लाख रुपये अदा केले आहेत. पाच कारखान्यांकडे १४३ कोटी ४७ लाखांचे येणे बाकी आहे.

यंदाच्या हंगामात ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने तशी विभागातील सर्वच कारखान्यांची सुरुवात दबकतच झाली. एक रकमी एफआरपी पहिली उचलीची घोषणा केल्याने ऊस दराचे आंदोलनही फार ताणले गेले नाही. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हंगामाने गती पकडली.

१५ डिसेंबरपर्यंत विभागात ८५ लाख २७ हजार टनाचे गाळप कारखान्यांनी केले आहे. त्याचे एफआरपीप्रमाणे २२३२ कोटी ७१ लाख ८६ हजार रुपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत. अद्याप १४३ कोटी ४७ लाख १७ हजार रुपये एफआरपीमधील येणे बाकी आहे.

उसाच्या वजनाला फटका

यंदा उसाला अपेक्षित वजन मिळत नाही. एकरी पाच ते सात टनाने उसाचे उत्पादन कमी मिळत आहे. सततच्या पावसाचा परिणाम उसाच्या वाढीसह वजनावर झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कोल्हापूरचा उतारा १२.५० टक्के

कोल्हापूर विभागाचा सरासरी साखर उतारा १२ टक्के राहिला आहे. त्यातही काेल्हापूर जिल्ह्याचा उतारा सरासरी १२.५० टक्के असून सांगलीचा ११.९० टक्के आहे. येथून पुढे उताऱ्यात वाढ होणार आहे.

शंभर टक्के एफआरपी दिलेले कारखाने :

आजरा, राजाराम, शाहू, दत्त-शिरोळ, बिद्री, जवाहर, कुंभी, शरद, वारणा, अथणी-बांबवडे, डी. वाय. पाटील, दालमिया, गुरुदत्त, इको केन-चंदगड, अथणी-तांभाळे, अथर्व-दौलत, राजाराम बापू, राजाराम बापू (वाटेगाव युनिट), राजाराम बापू (कारंदवाडी युनिट), पतंगराव कदम, दत्त इंडिया, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया भारत, सद्गुरू श्री. श्री. (आटपाडी).

यांच्याकडे राहिली एफआरपी
कारखाना                          देय रक्कम
उदगिरी, खानापूर            १ कोटी ९३ लाख
हुतात्मा, वाळवा               २४ कोटी ३ लाख
संताजी घोरपडे               २७ कोटी ४५ लाख
ओलम, राजगोळी           २५ कोटी ५५ लाख
पंचगंगा, इचलकरंजी      २१ कोटी २८ लाख
मंडलीक, हमीदवाडा     ३५ कोटी ५ लाख
भोगावती, परिते             ४२ कोटी ९१ लाख.
 

Web Title: Hundred percent FRP from 27 factories in Kolhapur division, 2232 crores were given to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.