वन्यप्राण्यांकडून शेकडो एकरांतील पिके फस्त
By admin | Published: October 5, 2015 11:52 PM2015-10-05T23:52:32+5:302015-10-06T00:22:02+5:30
प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी : पिकांचे पंचनामे करा; चिमणे-चव्हाणवाडी येथील घटना
रवींद्र येसादे - उत्तूर जोमकाईदेवी येथील डोंगराच्या पलीकडील बाजूस चिमणे (ता. आजरा) येथील म्हसोबा परिसरात वनगायींचा कळप, गवे, रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांनी शेकडो एकरांतील पिके फस्त झाल्याने चव्हाणवाडी-चिमणे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने वन्यप्राण्यांचा, तर महसूल विभागाने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.अधिक माहिती अशी, म्हसोबा परिसरात चिमणे, चव्हाणवाडी, बेलेवाडी (ता. आजरा) परिसरातील क्षेत्र येते. भात, भुईमूग, नाचणा, जोंधळा, आदी पिके घेतली जात आहेत. जोमकाईदेवीच्या डोंगरात वन्यप्राण्यांचे वास्तव्य वाढले आहे. गेली आठ दिवस गवे व वनगायी शेतातील पिके फस्त करीत आहेत. सायंकाळी आठ वाजल्यापासून पहाटेपर्यंत हे प्राणी फिरत असतात.रानडुक्कर व साळिंदर हे प्राणी भुईमुगाचे नुकसान करीत आहेत. काढणी योग्य पिके झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याअगोदरच वन्यप्राणी फडशा पाडत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. भात पिकात तर धुडगूस घातला जात आहे. त्यामुळे हे पीकही शेतकऱ्याला घेता येत नाही.अगोदरच दुष्काळाच्या झळांशी शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यातच वन्यप्राण्यांच्या शिरकाव वाढल्याने शेतीतील पीक असून, नसल्यासारखे शेतकऱ्यांना झाले. वर्षभर मशागत करून शेवटी शेतकऱ्याला काहीच मिळाले नाही, अशी दयनीय अवस्था झाली आहे.नुकसानग्रस्त परिसरातील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. प्राण्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा मानवी वस्तीत या प्राण्यांचा हल्ला होऊ शकतो. रात्रीचे शेतातील जाणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे.
नासधूस अधिक
वन्यप्राण्यांकडून पिके खाण्यापेक्षा नासधूस मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बांध पाडणे, झाडे पाडणे, आदी प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नुकसान वाढले आहे.
मदत नको, बंदोबस्त करा
शेतकऱ्यांना जुजबी मदत देण्यापेक्षा वनक्षेत्र मालकी क्षेत्र यामध्ये वनविभागाने मोठी चर मारावी. त्यामुळे वन्यप्राणी मालकी क्षेत्रात येणार नाहीत. तुमची मदत नको, मात्र बंदोबस्त करा, अशी मागणी चिमणे येथील महादेव आजगेकर यांनी केली आहे.