ज्योतिर्लिंग मंदिर केळोशी खुर्द देवराई संगोपनासाठी सरसावले शेकडो हात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 04:27 PM2020-07-06T16:27:10+5:302020-07-06T16:27:33+5:30
श्रीकांत ऱ्हायकर धामोड- मंदीर परिसरामध्ये विविध प्रकारच्या फळ व फुलझाडांबरोबर औषधी वनस्पतींची लागवड करून मंदीर परिसर सुशोभित करण्याची संकल्पना ...
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड- मंदीर परिसरामध्ये विविध प्रकारच्या फळ व फुलझाडांबरोबर औषधी वनस्पतींची लागवड करून मंदीर परिसर सुशोभित करण्याची संकल्पना अगदी प्राचिन काळापासून रूढ असल्याचे दिसून येते . कारण आजही कांही प्राचीन मंदीरांच्या आवारात अशा देवराई जिवंत असल्याचे चित्र पहावयास मिळते. पण केळोशी खुर्द येथील प्राचिन जोतिर्लिंग मंदीर आवारात असलेली जुनी देवराई नष्ट झाली आहे. या देवराईला उर्जीतावस्था देण्यासाठी आता शेकडो हात सरसावले असून गेल्या वर्षापासून कांही स्थानिक पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन देवराई संवर्धनाला सुरवात केली आहे .
केळोशी खुर्द ग्रामपंचायतीमधील जोतिबा वसाहत येथील मंदीर परिसरातील शेकडो वर्षापूर्वीची देवराई नामशेष झाल्याने मंदीर परिसर भकास दिसत होता . पण स्थानिक पर्यावरणप्रेमी व कागल , करवीर येथील काही पर्यावरण प्रेमी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन गेल्या वर्षी या देवराईतील जुनी झाडे काढुन या ठिकाणी नवीन विविध फळ , फुल व औषधी वनस्पतींची लागवड केली . जवळपास पाचशे झाडांचे संगोपन करून ती सर्वच जगवली .
विशेष बाब म्हणजे सर्वच्या सर्व पाचशे झाडे जगवली . त्यासाठी ठिबक , खते , भांगलन , खुरपणी व पाण्याचे नियोजन व आर्थिक बाबीची पूर्तता स्थानिक पर्यावरण प्रेमींनी केली . एक विशेष बाब म्हणजे कोणतीही रासायनिक खते न वापरता फक्त शेंद्रिय खतेच वापरून या झाडांची निगा राखली आहे .नविन साकारत असलेल्या या देवराईला काल एक वर्ष पूर्ण झाले . त्यानिमित्त देवराईतील झाडांचा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला .
झाडे लावणेसाठी व मशागत करण्यासाठी आलेले निसर्गप्रेमींचे स्वागत केळोशीचे सरपंच रंगराव पाटील व उपसरपंच निवास पाटील व प्रकाश पाटील यांनी केले . यावेळी राजू पाटील येळवडेकर ,लाड सर राशिवडे ,आबा मांगोरे अकनूर ,राजू पाटील , मारूती मोळे, श्रीकांत ऱ्हायकर,नितीन शेटे, अरूण बहिरशेट, बापू तामकर , डॉ.पी आर कुंभार, संजय मांगोरे सायकलपटू ,अशोक पाटील मिस्त्री ,प्रकाश पाटील मिस्त्री ,अजित पाटील, दादू पाटील, तुकाराम कांबळे, दिव्य ज्योती मित्र मंडळ कागल बेनिक्रेचे रमेश पाटील, धोंडीराम देवडकर, शंकर गुरव इत्यादी निसर्गप्रेमी उपस्थित होते . ग्रामसेवक यशपाल पावरा यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली
केळोशी खुर्द ( ता. राधानगरी ) येथील देवराईत झाडांची लागवड करून अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा करताना पर्यावणप्रेमी