काळम्मावाडी कालव्यास गळती, शेती नापीकीचा धोका; शेकडो एकर जमिनीला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 12:18 PM2022-02-25T12:18:52+5:302022-02-25T12:32:17+5:30
कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे डाव्या व उजव्या कालव्यातील पाण्याची सतत गळती होऊन धरण परिक्षेत्रातील जवळपास २० गावांतील कालवेग्रस्त भूमीपुत्रांची शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे.
निवास पाटील
सोळांकूर : महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल या उद्देशाने काळम्मावाडी धरणाची उभारणी केली गेली. वर्षानुवर्षे कोरड असणारी जमीन ओलिताखाली आल्याने बहुतांशी भाग सुजलाम् सुफलाम झाला आहे. पण या प्रकल्पाकडे सध्या दुर्लक्ष झाले आहे. कोणतेही विकासात्मक काम न होता हे धरण समस्यांच्या गराड्यात सापडले आहे.
त्यापैकी कालव्यातील गळतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे डाव्या व उजव्या कालव्यातील पाण्याची सतत गळती होऊन धरण परिक्षेत्रातील जवळपास २० गावांतील कालवेग्रस्त भूमीपुत्रांची शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे.
काही एकर शेतात सततच्या पाण्यामुळे दलदल निर्माण होऊन पिकांच्या उत्पादनात घट होऊन उत्पादन निम्म्यावर आले आहे. शेतातील मशागती, खते यांचा विचार करता लाखोंचा फटका भूमिपुत्रांना सोसावा लागत आहे. जमिनीचे उत्पादन घटल्याने पीक कर्जासाठी काढलेले कर्जदेखील फेडताना भूमिपुत्रांना घाम फुटत आहे. आटेगाव पंडेवाडी या गावात राहत्या घरामध्ये पाण्याचे उमाळे फुटले आहेत. पोवारवाडी, आटेगाव, पंडेवाडी, मल्लेवाडी येथील काही घरांच्या पायातूनच पाण्याचे पाट वाहत आहेत.
तसेच काळम्मावाडी, लिंगाचीवाडी पनोरी, हेळेवाडी, पनोरी, मल्लेवाडी, मोघर्डे, सुळंबी, सोळांकुर, पंडेवाडी, ढेंगेवाडी, सावर्डेपाटणकर, पोवारवाडी, आटेगाव, उंदरवाडी, बुजवडे तसेच कालव्यालगत असणाऱ्या अनेक शेतामध्ये पाणी उमटून जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे, तर काही शेतात माठाचे अंश दिसत आहेत.
सन १९९३-९४ पासून काळम्मावाडी धरणाच्या मुख्य कालव्यातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आले. मुख्य कालवा कि.मी १ ते कि.मी. १० मध्ये सिमेंटचे अस्तरीकरण करण्यात आले होते. पण येथील जमीन विचित्र भूस्तराची असल्याने अनेक वेळा कालवा फुटीचे प्रकार घडलेले आहेत. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तेवढ्यापुरते पंचनामे झाले; पण नुकसानभरपाई मिळाली नाही. काही शेतकऱ्यांनी कालव्यालगतची जमीन कसणे सोडून दिले आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंती उभारूनदेखील लोकांच्या घरात पाण्याचे उमाळे फुटले आहेत.
कालवेग्रस्तांनी अनेक वेळा रस्ता रोको, आंदोलने व संघर्ष करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. पाण्याच्या गळतीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडणारा कोणी वाली भेटणार का ? अशी आर्त हाक भूमिपुत्र करत आहेत.
२६ वर्षांपासून कालव्यांची डागडुजी नाही
गेली २६ वर्षे मुख्य कालव्यासह डाव्या व उजव्याची कोणत्याही प्रकारचे डागडुजी अथवा नवीन काम करण्यात आले नाही. नियोजित पोट कालवे अद्याप कागदावर आहेत. काही ठिकाणी कालव्यात झाडेझुडपे वाढली आहेत, तर कालव्यात दगड, खाचखळगे आहेत. प्रायोगिक तत्त्वावर जिओ सिंथेटिक अस्तरीकरणचा प्रयोग करण्यात आला होता. त्यालाही वाटण्याच्या अक्षदा लागल्या आहेत.