घरी उपचार घेणारे शंभर रुग्ण कोविड केंद्रात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:49+5:302021-06-02T04:19:49+5:30
इचलकरंजी : शहरातील कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार येथील नगरपालिका प्रशासनाने शहरातील सहा केंद्रांची सहा पथके नेमून ...
इचलकरंजी : शहरातील कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार येथील नगरपालिका प्रशासनाने शहरातील सहा केंद्रांची सहा पथके नेमून घरात उपचार घेणा-या रुग्णांना विविध अलगीकरण केंद्र व इतर खासगी केंद्रांमध्ये हलविले. आता शहरात नियमानुसार घरांमध्ये सोय असणारे २० ते २२ रुग्ण घरी उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी सुनीलदत्त संगेवार यांनी दिली.
दुस-या लाटेत घरी उपचार घेणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जावून २०० वर पोहोचली होती. परंतु पॉझिटिव्ह रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक यांच्याकडून संसर्ग वाढत असण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने होम आयसोलेशन (घरी उपचार) बंद करून सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड केंद्रात दाखल करावे. तसेच संबंधितांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना तपासणी करून त्यांनाही घरातच क्वारंटाइन करावे, अशा सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या. त्यानुसार मंगळवारी नगरपालिकेने सहा पथकांमार्फत शहरातील घरी उपचार घेणाºया १२० रुग्णांना भेटून त्यातील नियमानुसार सोय नसणा-या शंभरजणांना पालिकेच्या कोविड केंद्रात दाखल करण्यात आले.